मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने राज्यभर वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाढत्या खर्चामुळे वीजदरवाढ करण्यास संमती दिली आहे. राज्य वीज वितरण कंपनीलाही (Mahadiscom) येत्या दोन वर्षांसाठी अनुक्रमे २.९ ते ५.६ टक्के दरवाढीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यभर दरवाढीची वीज कोसळणार आहे. इंधनाचे वाढलेले दर, तसेच कोरोना काळात कमी झालेला महसूल, वीज वितरण खर्चात झालेली वाढ या सर्वांचा विचार करून आयोगाने सर्व वीज कंपन्यांना दरवाढीस मंजुरी दिली आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्यासह राज्य वीज वितरण कंपनीला शुक्रवारी (ता. ३१) रात्री दरवाढीची परवानगी दिली. राज्य वीज वितरण कंपनीला २०२३-२४ या वर्षासाठी सरासरी २.९ टक्के तर २०२४-२५ या वर्षासाठी सरासरी ५.६ टक्के वीज दरवाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात वीज वितरण कंपनीने अनुक्रमे १४ टक्के व ११ टक्के दरवाढीची परवानगी मागितली होती. त्यानुसार ही संमती देण्यात आली आहे.
पुढील दोन वर्षांच्या आपल्या महसुलात ६७ हजार कोटी रुपयांहूनही जास्त तूट येईल, असा अंदाज राज्य वीज वितरण कंपनीचा होता; तर वीज वितरण कंपनीने येत्या दोन वर्षांत वीज दरवाढ करून यापैकी सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची तूट भरून काढावी, असे आयोगाने निर्धारित केले आहे.
मुंबई उपनरातही वीज वितरण करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिीसिटी, टाटा पॉवर, मुंबई शहरासाठी ‘बेस्ट’ने ‘एमईआरसी’कडे मागील थकबाकीबरोबरच २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या वीजदर निश्चितीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर जनसुनावणी घेतल्यानंतर आयोगाने दरवाढ जाहीर केली. त्याचा भार सर्वसामान्य घरगुती ग्राहकांबरोबच औद्योगिक, वाणिज्यक ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
कृषी क्षेत्राच्या वीज ग्राहकांसाठी वेगळी वीज कंपनी तयार करण्याचेही आयोगाने राज्य सरकारला सुचविले आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीने पद्धती ठरवावी, असेही आयोगाने सांगितले. या नव्या कंपनीमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार वीजपुरवठा होईल तसेच त्यांच्या विजेच्या खपावर योग्य लक्ष ठेवता येईल, असेही आयोगाचे म्हणणे आहे.
डिजिटलसाठी सवलत कायम
डिजिटल माध्यमातून वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेवरील पाव टक्का सवलतही आयोगाने कायम ठेवली आहे. तर कागदी बिलाऐवजी डिजिटल माध्यमातून बिले मागवणाऱ्या ग्राहकांना प्रति बिलामागे मिळणारी दहा रुपये सवलतही आयोगाने कायम ठेवली आहे.
अदानी-टाटांची वीजही महाग
मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात मोठी वाढ झाली असून ग्राहकांना प्रतियुनिटमागे ४० ते ७५ पैसे जादा मोजावे लागणार आहेत. टाटा पॉवरच्याही वीजदरात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांच्या ०-१०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांचा सध्याचा दर १.७० रुपये होता. तो आता ३.०५ रुपये एवढा झाला आहे.
मध्यमवर्गीयांबरोबच उच्चवर्गीयांना जवळपास दीड-पावणे दोन रुपये प्रति युनिटमागे जादा मोजावे लागणार आहेत. अदानी आणि टाटा पॉवरकडून ग्राहकांना लावल्या जाणाऱ्या स्थिर आकारात पाच रुपयांची वाढ झाली आहे.
वीज वहन आकारातही वाढ
वीज ग्राहकांना वीज दराबरोबरच ही वीज वाहून नेण्यासाठी येणारा खर्चही मोजावा लागतो. त्यानुसार वीज आयोगाने वीज वहन आकारातही मोठी वाढ केली आहे. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रतियुनिटचा वहन आकार १.४७ रुपये होता, तो आता २.२१ रुपये होणार आहे. ‘टाटा’चा प्रतियुनिटचा वहन आकार १.४७ वरून १.६८ रुपये एवढा झाला आहे. ‘बेस्ट’च्या वीज वहन आकारातही ३० पैशांची वाढ झाली आहे, त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.