पुणे (Pune) : पुणे विमानतळाचा (Pune Airport) ‘विंटर शेड्यूल’ सुरू होऊन एक महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले. मात्र, अजूनही विमानासाठी राखीव ठेवलेले स्लॉट रिकामेच आहे. रात्रीच्या वेळचे विशेषतः शनिवारी व रविवारचे स्लॉट रिकामेच राहिले आहे. त्यामुळे विमानतळावरील विमानांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. अजूनही पुणे विमानतळावरून रोज १७० ते १७५ विमानांची ये-जा होते. स्लॉटचे नियोजन मात्र २१८ विमानांसाठी केले. म्हणजे रोज सुमारे वीस स्लॉट रिकामे राहिले आहेत. विमानतळ प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.
पुणे विमानतळाच्या ‘विंटर शेड्यूल’ला ३० ऑक्टोबरपासून सुरवात झाली. यात नवीन शहरे जोडली जावीत तसेच जास्तीच्या उड्डाणे व्हावीत हा उद्देश होता. मात्र, तसे झाले नाही. विमानतळ प्रशासनाने जास्तीचे स्लॉट उपलब्ध करून दिले. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांची मात्र सेवा देण्यास अनुकूलता दर्शवली नाही. परिणामी महिन्याभरात नंतरही पुणे विमानतळाचे सुमारे २० स्लॉट रिकामे राहिले आहेत. विशेषतः शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात स्लॉट रिकामे आहेत. त्यामुळे पुणे विमानतळाचे विंटर शेड्यूल प्रवाशांसाठी ‘कोरडे’ ठरले.
स्लॉट वाढले अन् रिकामे राहिले
- पुणे विमानतळावर विंटर शेड्यूल पूर्वी रोज सरासरी १६० ते १७० विमानांची ये-जा होते. विंटर शेड्यूलमध्ये यात फारसा फरक राहिला नाही. सिंगापूर व बँकॉक वगळता नवीन सेवा सुरू झाली नाही.
- सोमवार ते शुक्रवार दरम्यान १०९ स्लॉट म्हणजेच २१८ विमानांसाठी स्लॉट देण्यात आला. पैकी १७० ते १७५ विमानांची वाहतूक होत आहे.
- शनिवारी २२० विमानांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ १६२ विमानांची वाहतूक होईल. म्हणजे जवळपास ५८ विमानांची सेवा देण्यास विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी अनुत्सुकता दाखवली आहे. दर शनिवारी २९ स्लॉट रिकामे आहेत.
- रविवारीदेखील अशीच परिस्थिती आहे. रविवारी २४९ विमानांच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात २०३ विमानांची वाहतूक होते. ४६ विमानांच्या सेवेस कंपन्यांनी पाठ फिरवली. रविवारी २३ स्लॉट रिकामे राहिले आहेत.
काय आहेत कारणे?
१) विमानतळावर असणाऱ्या अपुऱ्या सुविधा.
२) रात्री असणारा प्रवाशांचा प्रतिसाद.
विंटर शेड्यूलमध्ये जास्तीत जास्त विमानांचे उड्डाण व्हावे या दृष्टीने नियोजन केले. विमानसेवा देणे ही त्या कंपनीची जवाबदारी आहे. यात आम्ही काही करू शकत नाही.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ
एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्लॉट रिकामे राहात असतील तर विमानतळ प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा. उलट रात्रीच्या वेळी विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. मग पुणे विमानतळाचे रात्रीचे स्लॉट कसे काय रिकामे राहत आहे. ही बाब चांगली नाही.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ