पुणे (Pune) : ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) खाणावळीचे टेंडर (Tender) रद्द करण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO) दूरध्वनी आला. सुमारे पाच-सहा मिनिटे दूरध्वनीवरील संभाषण सुरू होते. त्यानंतर अधिष्ठाता कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत चौकशी असता तो ‘बनावट कॉल’ असल्याचे उघड झाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा स्वीयसहायक (पीए) बोलत आहे, असे सांगत डॉ. ठाकूर यांना फोन आला. ससून रुग्णालयात सुरू असलेल्या खाणावळीचे दुसरे टेंडर भरा, असा आदेश त्या फोनवरून अधिष्ठात्यांना देण्यात आला. संबंधित व्यक्तीने अधिष्ठात्यांना मोठ्या रुबाबात एक-एक सूचना देण्यास सुरवात केली.
‘‘ससून रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरक्यू मेस बंद करा. तेथे तातडीने दुसरे टेंडर काढा,’’ असा आदेश डॉ. ठाकूर यांना दिल्याची माहिती मिळाली. जवळपास ५ ते ६ मिनिटे हा फोन सुरू होता.
फोनवरून बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीबद्दल अधिष्ठाता आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांना संशय आला. हा कॉल बनावट असेल, याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र असा कुठला ही आदेश दिल्या नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून समजले. याबाबत डॉ. ठाकूर म्हणाले, टेंडरबाबत दूरध्वनी आला होता. पण जी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे होईल. रुग्णसेवा ही सर्वांत महत्त्वाची आहे. त्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.