पुणे (Pune) : चांदणी चौकातील पूल रविवारी पहाटे एक वाजता १.२ सेकंदात तीन ब्लास्ट करून पाडण्यात आला. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच मातीचा ढिगारा व पुलाचे अवशेष काढण्याचे काम सुरु झाले. पहाटे चार वाजेपर्यंत हे काम सुरु होते. त्यानंतर पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ३.५ मीटरचा रस्ता रुंदीकरणास सुरवात झाली. अवघ्या नऊ तासांत डांबरीकरण करून दोन लेन तयार झाल्या. दरम्यान, साडेचार वाजण्याच्या सुमारास एक छोटा स्फोट झाला. त्याची तीव्रता कमी होती. त्यामुळे कोणाला इजा झाली नाही. सुमारे ५६० डंपर भरून मातीचे ढिगारे काढण्यात आले. त्याचा वापर सेवा रस्त्यासाठी करण्यात आला.
रविवारी रात्री ११ वाजताच चांदणी चौक निर्मनुष्य करण्यात आला. वाहतूक ठिकठिकाणी थांबविण्यात आली. १२ वाजून ४५ मिनिटांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची अंतिम परवानगी घेण्यात आली. एक वाजण्यास १० सेकंद कमी असतानाच काऊंटडाऊन सुरु झाला. एक वाजताच ट्रिगर दाबून पूल पाडला. अवघ्या १.२ सेकंदात तीन ब्लास्ट लागोपाठ झाले. म्हणजे एक स्फोटासाठी सेकंदाचा ४० वा भाग इतका कमी वेळ लागला. त्यामुळे अवघ्या १.२ सेकंदात तीन ब्लास्ट झाले अन् पूल खिळखिळा झाला. दरम्यान, पूल पाडतेवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची पुण्यासह सोलापूरची टिम उपस्थित होती.
पूल कोसळला का नाही?
स्फोट झाल्यावर पूल कोसळेल असा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही. पुलाखाली लोखंडी सळई, तसेच पिलरचा अवशेष दिसत होते. त्यावेळी स्फोटाचा प्रयोग फसला का? असे वाटले. मात्र पुलाची लांबी व रुंदी कमी होती. त्यामुळे जास्त ड्रिलिंग करता आले नाही. पुलाच्या मजबुतीसाठी मोठ्या प्रमाणात स्टीलचा वापर करण्यात आला होता. मजबूत गर्डर असल्याने पूल तत्काळ खाली कोसळला नाही. मात्र हा स्फोट पूर्णपणे यशस्वी झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व एडिफीस कंपनीचे अधिकारी आनंद शर्मा यांनी जाहीर केले.
सात दिवसांत सेवा रस्ता
पूल पाडल्यावर सेवा रस्त्याचे काम मोठ्या वेगाने होणार आहे. पूल पाडल्यावर दोन नवे लेन तयार झाले आहे. सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर आणखी दोन नवे लेन तयार होतील. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या वाहनधारकांसाठी चांदणी चौकात पाच लेन तयार होतील. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच, सेवा रस्त्याचे काम येत्या सात दिवसांत केले जाणार आहे.
२४३ कर्मचारी
पूल पाडण्याचे काम
४२३ पोलिस
वाहतूक व अन्य कारणांसाठी
१४ डंपर (तासाला ४० खेपा)
राडारोड्याचे नियोजन
५६० डंपर
मातीचे ढिगारे काढले