पुणे (Pune) : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे (Chandani Chwok Flyover) काम करताना वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी पाषाण-एनडीए महामार्गावरील पूल पाडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे कोथरूड, सातारा, कात्रज भागातून येणाऱ्या वाहनचालकांना एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून मुळशीकडून येणाऱ्या रॅम्पवरून उतरून जावे लागणार आहे. मात्र, याचठिकाणी सध्या महामार्ग आणि बावधनच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आणखी नव्याने वाहनांची भर पडणार असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यायी मार्गाची किंवा पुलाची व्यवस्था न करता थेट पूल पाडला जाणार असल्याने हा निर्णय रोगापेक्षा इलाज भयंकर असाच प्रकार ठरण्याची भीती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकाच्या कामाची माहिती घेताना या चौकात पाषाण-एनडीए या पुलाखाली केवळ दोन लेन आहेत, हा रस्ता रुंद करणे गरजेचे असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर रस्ता रुंद करण्यासाठी पाषाण-एनडीए हा पूल पुढील १५ दिवसांत पाडून टाकावा असा निर्णय घेतला आहे. मात्र, हा पूल पाडला तरी येथील खडक फोडून रस्ता रुंदीकरणासाठी व पूल बांधण्यासाठी किमान पाच ते सहा महिने जाणार आहेत. त्यामुळे या पुलाच्याअलीकडे मुंबई, मुळशी, बावधन, पाषाण इथून येणाऱ्या वाहनांना भयंकर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल. हा पूल पाडायचा निर्णय मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक घेतल्याने प्रत्यक्षात याठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व वाहनचालकांना रोज नव्या अग्निदिव्यातून जाण्याची वेळ येणार आहे.
या समस्यांवर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता, या विषयात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असल्याने ऑन रेकॉर्ड बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, नवा पूल पूर्ण होईपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल, वाहनांच्या रांगा आणखी लांबणार असल्याचे त्यांनी मान्य केले.
जुना पूल पाडण्यापूर्वी नवा पूल बांधण्यासाठी घेतला असता रस्त्याच्या मध्यभागी पिलर घ्यावे लागणार, त्यामुळे महामार्गाची एक लेन कमी करावी लागेल आणि पुन्हा वाहतूक कोंडी वाढेल. त्यामुळे जुना पूल पाडून, लेन वाढवूनच नव्याने २४ मीटरचा पूल बांधावा लागणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) केले जात आहे. हा पूल व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले. गेल्यावर्षी पुलाच्या कामाची पाहणीही केली होती. आता पाषाण-एनडीए पूल पाडला जाणार असल्याने याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, २ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात आहेत, ते पण याबाबत माहिती घेतील असे त्यांनी सांगितले.