पुणे (Pune) : मेट्रो व उड्डाण पुलाच्या कामामुळे गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले कर्वे रस्त्यावरील दुतर्फा पार्किंग पुन्हा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महापालिकेत केली. याबाबत कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन, मनसेची जनाधिकार सेना यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या निर्णयामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
येथील पार्किंग पूर्ववत करावे, या मागणीसाठी पुणे व्यापारी महासंघ, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि मनसेची जनाधिकार सेना बुधवारी (ता. २१) आंदोलन करणार होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी यासंदर्भात महापालिकेत बैठक घेतली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार,
प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, कर्वे रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका तसेच उपाध्यक्ष अजित सांगळे, महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष हेमंत संभूस, विनिता ताटके, प्रियांका पिसे, रोहित गुजर, संतोष पाटील, केदार कोडोलीकर, आकाश बुगडे, राहुल वानखडे आदी उपस्थित होते.
कर्वे रस्त्यावर खंडुजीबाबा चौक ते हुतात्मा राजगुरू चौकापर्यंत (करिश्मा सोसायटी परिसर) दोन्ही बाजूस ‘नो पार्किंग’मुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. मेट्रो व उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होऊन एक वर्ष उलटून गेले तरीही नो पार्किंग हटविण्यासंदर्भात निर्णय होत नव्हता.
कर्वे रस्त्यावरील पार्किंग समस्येवर आज बैठक घेतली. व्यावसायिक व नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही, अशा ठिकाणची पाहणी करून पोलिसांनी नो पार्किंगचे फलक काढून टाकावेत. व्यावसायिक, स्थानिक रहिवासी यांची समस्या त्वरित सोडवावी, असा आदेश आजच्या बैठकीत दिला आहे.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
कर्वे रस्त्यावरील पार्किंग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय आज घेतला आहे. वाहतूक पोलिस आणि स्थानिक नागरिक प्रत्यक्ष जागा पाहणी करून कुठे पार्किंग करायचे, याचा निर्णय घेऊन वाहतूक पोलिस आदेश काढतील.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
विकास प्रकल्पाला सहकार्य करण्यासाठी कर्वे रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला चार वर्षे सहकार्य केले. कर्वे रस्त्यावर पार्किंग सुरू करण्याच्या आमच्या पाठपुराव्याला यश आले.
- हेमंत संभूस, प्रदेशाध्यक्ष, मनसे जनाधिकार सेना
पार्किंग नसल्यामुळे कर्वे रस्त्यवरील व्यावसायिक आणि ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. प्रशासनाने आता या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.
- ओमप्रकाश रांका, अध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन