पुणे (Pune) : मुंबई-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या (Vande Bharat Express) वेळेत बदल होणार आहे.
या संदर्भात सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यात त्यांनी सध्याची वेळ सोयीची नसल्याचे सांगून वेळ बदलाची मागणी केली. त्यानुसार मुंबईहून संध्याकाळी सहा वाजता रेल्वे सोडावी, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावेळी गाड्यांची गर्दी व फलाटांची उपलब्धता नसल्याने रेल्वे प्रशासन संध्याकाळी सातच्या सुमारास सोडण्याची शक्यता आहे.
मुंबई-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबईहून ही रेल्वे दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी सुटते. सोलापूरला रात्री १० वाजून ४० मिनिटांनी पोचते. मुंबईहून सुटण्याची वेळ लवकर असल्याने प्रवाशांना कामे अर्ध्यावरच सोडून यावे लागते. त्यामुळे काही प्रवासी मुंबईहून परत येताना सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापूर गाठतात. त्यामुळे वेळ बदलणे गरजेचे आहे. वेळ बदलल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल व उत्पन्नही वाढणार आहे.
आता ही रेल्वे पुण्याला संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी येते. पाच मिनिटांचा थांबा घेऊन मार्गस्थ होते. वेळ बदलल्यास पुण्यात येणाऱ्या वेळेतही बदल होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक असल्याने एप्रिल किंवा मे महिन्यात याबद्दल नोटिफिकेशन काढून एक्सप्रेसची वेळ बदलली जाण्याची शक्यता आहे.
५३ हजार जणांचा प्रवास
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू झाल्यानंतर ३२ दिवसांच्या कालावधीत सुमारे ५३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून यातून सुमारे चार कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवासी संख्या आणखी वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळ बदलणे आवश्यक आहे.
मुंबईहून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांशी चर्चा झाली आहे. वेळ बदलण्यासाठी रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे.
- डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, खासदार, सोलापूर