पुणे (Pune) : हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने सध्या मुंबई-पुणे-हैदराबाद या प्रस्तावित हाय स्पीड ट्रेनच्या मार्गाचे ‘डीपीआर’चे काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत ते रेल्वे बोर्डाला सादर केले जाईल. रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ‘डीपीआर’मध्ये बोरघाटात हाय स्पीड ट्रेनसाठी नवीन बोगदे तयार केले जातील. यासाठी अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बोरघाटातला वेग हा ताशी ३०० किलोमीटरचा असेल, तसेच पुणे ते हैदराबाद हा मार्ग उन्नत असणार आहे. (Mumbai-Pune-Hyderabad Highspeed Train)
मुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड ट्रेनला अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, वाराणसी व पंढरपूर हे दोन तीर्थक्षेत्र हाय स्पीड ट्रेन एकमेकांना जोडण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाच्या स्तरांवर सुरू आहे. त्यामुळे प्रस्तावित मुंबई-हैदराबाद हाय स्पीड ट्रेन ही पुणे-बारामती-पंढरपूर अशी धावणार आहे. बोरघाट वगळता अन्य ठिकाणी हाय स्पीड ट्रेनसाठी उन्नत मार्ग ‘डीपीआर’मध्ये सुचविले आहे. उन्नत मार्गामुळे हाय स्पीड ट्रेनसाठी कमी जागा लागणार आहे. त्यामुळे जागा हस्तांतराचे काम वेगाने होईल. तसेच प्रकल्पाचा खर्चात देखील बचत होणार आहे.
मुंबईच्या नवीन विमानतळाजवळ स्टेशन
मुंबई-हैदराबाद हाय स्पीड ट्रेनचे मुंबईतील नियोजित स्थानक हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असावे, असे ‘डीपीआर’मध्ये सुचविले आहे. त्यामुळे विमानतळ येथून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हाय स्पीड ट्रेनच्या स्थानकावर येणे सोपे पडेल. शिवाय हे स्थानक भुयारी करण्याचे देखील सागितले. हा डीपीआर एक ते दोन महिन्यांत रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. त्यानंतरच रेल्वे बोर्ड यावर निर्णय घेईल.