पुणे (Pune) : पुण्यातील संशोधकांनी तयार केलेल्या आणि भारत सरकारकडून पेटंट मिळालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जमिनीखालील पाण्याच्या प्रभावामुळे वर येणाऱ्या लहरी मोजण्याचे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे यंत्र पुण्यातील तीन संशोधकांनी तयार केले आहे. या यंत्राचा वापर द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याच बरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या घरात जर जिओपथिक स्ट्रेस असेल तर यंत्राच्या सहाय्याने तो कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
भारतीय संशोधक व प्राध्यापक डॉ. अविनाश खरात, डॉ. रविराज सोरटे, डॉ. नंदकुमार धर्माधिकारी यांनी हे तयार केले आहे. याला भारत सरकारने पेटंट म्हणून मंजुरी दिली आहे. ‘नावराज ॲटिनूएशन सिस्टम ॲन्ड मेथड फॉर ॲटिनूएशन ऑफ जिओपॅथीक स्ट्रेस’ या नावाने हे पेटंट आहे.
महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी आखावयाच्या तंत्रज्ञानाबाबत डॉ. खरात, डॉ. सोरटे, डॉ. धर्माधिकारी गेली दहा ते पंधरा वर्षांपासून या विषयावर वेगवेगळ्या मार्गाने संशोधन करीत होते. २०१४ मध्ये तिघांनाही न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठात या विषयावरील शोधनिबंध सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. विविध प्रकारे अभ्यास करून तिघांनी जमिनीखालील पाण्याच्या प्रभावामुळे ज्या लहरी जमिनीच्या दिशेने वर येतात, त्या लहरी मोजण्याचे यंत्र तयार केले. या यंत्राचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला. त्यात या यंत्राच्या साहाय्याने जमिनीच्या दिशेने येणाऱ्या लहरी कमी करता येतात, असे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारने पेटंट म्हणून मान्यता दिली आहे.
डॉ. सोरटे हे बावधन येथील पीव्हीपीआयटीच्या अभियांत्रिकी स्थापत्य विभागाचे प्रमुख असून याच विषयावर त्यांनी २०१७ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीही केली. संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता मिळाल्याने तिघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या संशोधनातून तयार झालेल्या यंत्रामुळे रस्त्यावरील अपघात कमी करून सर्वसामान्य जनतेचे जीव वाचविता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर घरातील जिओपॅथिक स्ट्रेस घालविण्यासाठी सुद्धा होवू शकतो. तसेच या माध्यमातून कॅन्सर सारख्या रुग्णांनाही दिलासा मिळू शकतो, असा तिघांचाही दावा आहे.
या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रस्त्यावरील अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. जमिनीखालच्या पाण्याच्या प्रभावामुळे ज्या लहरी तयार होतात. त्यांना जिओपॅथीक स्ट्रेस, असे संबोधले जाते. या लहरी जर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण झोपतो त्याच्या खाली असतील तर, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच बऱ्याचदा कॅन्सरला डिसीज ऑफ लोकेशन म्हणले जाते. वर्षानुवर्षांच्या अभ्यासातून अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या शोध निबंधातून हे सिद्ध केले आहे.
- डॉ. रविराज सोरटे, भारतीय शास्त्रज्ञ