पुणे (Pune) : Pune Metro मेट्रो प्रकल्पातील डेक्कन जिमखाना स्थानक (Deccan Gymkhana Metro Station) आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक (Sambhaji Garden Metro Station) पूर्णत्वाला आले असल्याचे महामेट्रोने (Mahametro) शनिवारी स्पष्ट केले.
गरवारे कॉलेज ते रामवाडी मार्गावरील कामे वेगाने सुरू असून, या महिना अखेरपर्यंत केंद्रीय रेल्वे सुरक्षा मंडळाकडून पाहणी होणार आहे. त्यानंतर या मार्गावर विस्तारीत वाहतूक प्रवाशांसाठी खुली होईल.
वनाज - रामवाडी मेट्रो मार्गावर गरवारे महाविद्यालयापर्यंत सध्या वाहतूक सुरू आहे. या मार्गावर आता गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल क्लिनिक दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावर डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, महापालिका भवन, शिवाजीनगर न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक ही स्थानके असून, त्यांची कामे वेगाने सुरू आहेत.
या मार्गावर गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे महापालिका, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज आदी ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान ही स्थानके नदीपत्रात असून स्थानके जमिनीपासून ६० ते ७० फूट उंचीवर आहेत.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित याबाबत म्हणाले की, डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ही दोन्ही स्थानके अत्यंत देखणी स्वरूपाची होत आहेत.