पुणे (Pune) : पुणे - नाशिक महामार्ग आणि तळेगाव - चाकण - शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी बाह्य वळणमार्गाची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी, वाहतूक विभागाचे उपायुक्त यांनी संयुक्तरित्या पाहणी करून चर्चा केली. हा नवा मार्ग झाल्यास सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या चाकणकरांना दिलासा मिळणार आहे.
या प्राथमिक पाहणीनंतर या मार्गांचे एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून बाधित होणाऱ्या जमिनीचे क्षेत्र काढून शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचे प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडीए’चे क्षेत्रीय अभियंता (खेड तालुका) जितेंद्र पगार यांनी सांगितले. चाकण येथे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. ही कोंडी सुरळीत करण्यासाठी काही पर्यायी मार्ग, तसेच बाह्यवळण मार्ग होण्याची गरज आहे, अशा आशयाची पत्रे ‘पीएमआरडीए’ला देण्यात आली होती.
क्षेत्रीय अभियंता पगार यांनी सांगितले की, तळेगाव - चाकण मार्गावरील सारा सिटी चौक ते खराबवाडी (प्रस्तावित डीपी रस्ता ३० मी. रुंदी, ९०० मी. लांबी), तसेच औद्योगिक वसाहतीतील सॅनी कंपनी ते नाणेकरवाडी औद्योगिक वसाहत ते पुणे - नाशिक महामार्गावरील समृद्धी सीएनजी पंप (प्रस्तावित डीपी रस्ता १५ मी. रुंदी, १.१६ किमी लांबी) या रस्त्याचा काही भाग एमआयडीसी हद्दीत असल्याने त्याचे रुंदीकरण करण्यासाठी एमआयडीसीला कळविणार असून, उर्वरित काम ‘पीएमआरडीए’ हाती घेणार आहे. मेदनकरवाडी बंगलावस्ती चौक (पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग) ते रासे फाटा (प्रस्तावित डीपी ३६ मीटर मार्ग, अंदाजित लांबी दोन किमी) हा चाकण येथील वाहतुकीसाठी महत्त्वाचा बाह्यवळण मार्ग आहे.