पुणे (Pune) : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोची ३१ स्थानके, प्रवाशांची चढ-उतार, मेट्रोचा वेग यासारख्या अनेक गोष्टींची खबरबात ठेवण्यासाठी महामेट्रोने शिवाजीनगरमध्ये नियंत्रण कक्ष (कमांड ॲण्ड कंट्रोल रूम) उभारला आहे. येत्या १५ दिवसांत तो कार्यान्वित होणार आहे. या कक्षातून काही क्षणांतच कोणत्याही मेट्रोच्या चालकाशी किंवा स्थानकावरील व्यवस्थापकाशी संवाद साधता येणार आहे. पुढील २५ वर्षांचे नियोजन करून या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड आणि स्वारगेट, तसेच वनाज-रामवाडी या मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रो ६ मार्च रोजी कार्यान्वित झाली आहे. त्यातील १० स्थानके दोन आठवड्यात या नियंत्रण कक्षाशी जोडली जातील. त्यामुळे प्रवाशांची चढ-उतार, मेट्रोचा वेग, प्रवाशांची गर्दी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आदींवर लक्ष ठेवता येईल, अशी माहिती महामेट्रोचे संचालक (तांत्रिक) विनोद अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. या प्रसंगी संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.
असा असेल कक्ष
- शिवाजीनगर डेपोमध्ये ८ हजार चौरस फुटांत नियंत्रण कक्ष
- १० स्थानकांवर ५०० कॅमेऱ्यांशी जोडला जाणार कक्ष
- कक्षातील १८ स्क्रिनच्या डिजिटल डिस्प्लेवरून ठेवले जाणार लक्ष
- ३२ व्हिडिओ स्क्रिनद्वारे २४ कर्मचारी दिवसभर ठेवणार लक्ष
- मेट्रोचे विस्तारित मार्गही या कक्षाला जोडले जाणार
नियंत्रण कक्षातून यावर ठेवले जाणार लक्ष
- मेट्रो स्थानकांवर गर्दी, प्रवाशांची चढ-उतार
- वेळापत्रकाची तंतोतंत अंमलबजावणी
- मेट्रोला ९० सेकंदांपेक्षा जास्त उशीर होणार नाही, यावर लक्ष
- कोणत्याही स्थानकावर काही घटना घडल्यास त्याबाबत उपाययोजना
- विजेचा वापर किती होत आहे, व्होल्टेज लेव्हल काय आहे
- लिफ्ट, सरकते जिने (एक्स्लेटर) व्यवस्थित सुरू आहेत का
- अग्निशमन उपकरणांतील पाण्याची पातळी
- प्रवासी सुरक्षितता जोपासणे
...तर नियंत्रण कक्ष मदतीला
मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावर प्रवाशाला काही अडचण आली आणि मदतीसाठी त्याने तेथील लाल रंगाचे बटण दाबले तर, मेट्रो हेल्पलाइनशी त्याचा संपर्क होईल. स्टेशन व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडून फोन उचलला न गेल्यास तो थेट नियंत्रण कक्षात येईल. येथून त्याला मदत केली जाईल.
नियंत्रण कक्ष प्रत्येक मेट्रोसाठी असतोच. परंतु, महामेट्रोच्या कक्षात जगातील अत्याधुनिक संपर्क आणि सिग्नल प्रणाली वापरण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षितता हा केंद्रबिंदू ठेवून या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. प्रवासी, मेट्रो आणि प्रशासन यावर लक्ष ठेवण्यासाठी हा कक्ष कार्यान्वित असेल.
- विनोद अग्रवाल, संचालक (तांत्रिक)