‘नमामी इंद्रायणी’ला मुहूर्त; इंद्रायणी नदी पुनरुज्जीवनासाठी पर्यावरण विभागाची एनओसी

Namami Indrayani
Namami IndrayaniTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : बहुचर्चित इंद्रायणी नदी पुनरुज्जीवनासाठी (नदी सुधार प्रकल्प) राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, आता टेंडर प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Namami Indrayani
Pune: 'त्या' जमिनी सरकारच्या ताब्यात घ्या! अजितदादांनी काय दिला आदेश?

पिंपरी-चिंचवड शहराची उत्तर सीमा इंद्रायणी नदीमुळे निश्चित झाली आहे. तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत सुमारे २०.६ किलोमीटर नदीची लांबी शहराला लाभली आहे. नदीच्या उत्तरेस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) हद्द आहे. यामध्ये येलवाडी, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धोनोरे आदी गावांचा समावेश आहे. शहरालगतचे देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहेत. आषाढी, कार्तिकी वारी, संत तुकाराम महाराज बीज सोहळा यांसह वर्षभर वारकरी या दोन्ही तीर्थक्षेत्री दर्शनासाठी येतात. इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. नदी लगतची शहरं, गावं आणि औद्योगिक परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषण वाढल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नदी प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन इंद्रायणी नदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव जुलै २०१९ मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे मांडला होता. त्यावर अनेक बैठकी झाल्या. अखेर नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नदी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.

Namami Indrayani
Pune Ring Road : पूर्व भागातील रिंग रोडसाठी आठ कंपन्यांनी भरले टेंडर, आता...

प्रकल्पाचा डीपीआर मंजूर

पिंपरी-चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद, पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांसह राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा (डीपीआर) मंजूर आहे. प्रशासनाने टोपोग्राफी सर्व्हे, जिओटेक्निकल सर्व्हे, बेसमॅप, लॅन्डयुज, प्रकल्प आराखडा, नकाशे, कन्सेप्ट मास्टर प्लॅन तयार केला आहे.

‘‘इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आता निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.’’

- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका

‘नमामी इंद्रायणी’ला मुहूर्त

पिंपरी-चिंचवडकरांसह राज्यातील वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची बहुप्रतिक्षीत ‘एनओसी’ मिळाली आहे. त्यामुळे प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये नदीला मातास्वरूप मानले आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. प्रकल्पाच्या ‘डीपीआर’पासून महापालिका ते पार्लमेंट सातत्याने पाठपुरावा केला. २०१८ मध्ये महापालिका प्रशासनाकडून सल्लागाराची नियुक्ती झाली. पण, राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अडीच वर्षे हा विषय प्रलंबित राहिला. तसेच, तांत्रिक अडचणींमुळे पर्यावरण विभागाची ‘एनओसी’ लांबणीवर पडली होती. याबाबत विधिमंडळ अधिवेशन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्याला यश मिळाले आहे. आता लवकरच प्रकल्पाच्या निविदा प्रसिद्ध करून कामाला सुरुवात करता येणार आहे. ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अंतर्गत पाहिलेले आणखी एक स्वप्न ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाला आता बळकटी मिळाली आहे, याचा आनंद आहे. प्रशासनाने हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा, अशी अपेक्षा आहे.’’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com