नगरनंतर आता 'शिवाई' ई-बस धावणार पुण्यातून 'या' शहराकडे

Shivai bus
Shivai busTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे आणि नगरदरम्यान पहिली ई-बस धावली. या पहिल्या दिवशी पहिल्या फेरीत पुणे ते नगर असा ३९ प्रवाशांनी प्रवास केला असून, यातून ९ हजार २०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नगर ते पुणे बसच्या पहिल्या फेरीत ३२ प्रवाशांनी प्रवास केल्याने यातून ७०९५ रुपये इतके उत्पन्न मिळाले. आता भविष्यामध्ये एसटी प्रशासन कोल्हापूरसाठी देखील ही सेवा सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जुलै महिन्यात पुणे विभागाकडे १७ ई-बस दाखल होणार आहेत. या बस पुण्यात दाखल झाल्यावर पुणे-कोल्हापूर ई-बस धावेल. तर पुणे-नगर मार्गावर दिवसातून ८ फेऱ्या होणार आहेत.

Shivai bus
पुण्यात ST, Metro, PMP, रिक्षा, खासगी बस सुविधा एकाच ठिकाणी

पुणे हे ‘ई-बस’चे बेस स्टेशन असणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुण्याला १५० बस मिळणार आहेत. या अंतर्गतच पुण्याहून कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, नाशिक व औरंगाबादसाठी ई-एसटी धावणार आहे. मात्र याला आणखी काही महिन्यांचा अवधी आहे. जुलै महिन्यात कोल्हापूरसाठी ‘ई-बस’ धावेल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सोलापूर साठी ई-बस धावेल. बससेवा सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम केले जाणार आहे. सप्टेंबरपर्यंत सोलापूरचे चार्जिंग स्टेशन तयार होईल. तर कोल्हापूरला चार्जिंग स्टेशनचे काम जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवले आहे.

Shivai bus
'लालपरी'चा नवा अध्याय सुरू; पुण्यातून राज्यभर धावणार एसटीची ई-बस

पुणे-नगर ई-बसचे वेळापत्रक

पुण्याहून सकाळी सात, अकरा, दुपारी तीन व सायंकाळी सात वाजता बस सुटेल. याचवेळी नगरहून पुण्यासाठीदेखील एसटी सुटेल.

तिकिटांचे दर : लालपरी : १८५, शिवाई : २७० (ई-बस), शिवशाही : २८५, शिवनेरी : ४२०

अजित पवार यांच्या हस्ते ई-बसचे उद्‍घाटन

राज्य परिवहन महामंडळाच्या पहिल्या ई-बसचे उद्‍घाटन बुधवारी शंकरशेठ रस्त्यावरील विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

एसटी आपली वाटली पाहिजे : पवार

राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून, महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गुणवत्तावाढीसाठी नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देणे हेच एसटीचे ध्येय आहे. याच उद्दिष्टांवर आधारित प्रदूषण , आवाज विरहित ‘शिवाई’ बस आहे. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहिजे, यासाठी सर्व सोयीसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com