पुणे (Pune) : मुंबई विभागात पुलाच्या कामासाठी २७ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबईला येणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत. यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचाही समावेश आहे. तर काही रेल्वे गाड्या मुंबईला न जाता पुण्यापर्यंत धावणार आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास सुरू राहणारे हेल्पडेस्क देखील सुरू केले आहे. प्रवाशांना आवश्यकता भासली तर पुणे स्थानकावरून एसटी गाड्या सोडण्याचे देखील नियोजन झाले आहे.
मुंबईत विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉकचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे. दोन दिवस मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळित होत आहे. अनेक प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या नियोजनात बदल केला आहे. शॉर्ट टर्मिनेट रेल्वे झाल्याने गदग-मुंबई ही रेल्वे मुंबई न जाता पुण्यापर्यंत धावेल. पुणे रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी स्थानकावर अतिरिक्त तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक यांची नियुक्ती केली.
आरक्षण केंद्र व चालू तिकीट खिडकीवर अतिरिक्त तिकीट खिडकी सुरू केली जाणार आहे. प्रवासी जर अन्य रेल्वेने दादर, कल्याणला जाऊ इच्छित असतील तर त्यांना पुढे अन्य रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे स्थानकांवर योग्य त्या उपाययोजना आखल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केली तर त्यांना मुंबईला एसटी ने देखील पाठविण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे.