पुणे (Pune) : दिवाळीसाठी सरकारने दिलेल्या आनंदाचा शिधा योजनेबद्दल अनेक शंका आहेत. हा शिधा पुरविण्याचे टेंडर सरकारने कुणाला दिले, त्याचे दर काय होते, किती दिवसांचे टेंडर काढले याची चौकशी व्हावी व चौकशीचा सर्व तपशील जनतेसमोर यावा. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्यातील वस्तू निकृष्ट दर्जाच्या आहेत. प्रसारमाध्यमांनी यात लक्ष घातले तर राज्यातील एक मोठा गैरव्यवहार उघडकीस येईल, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केला.
शेतकरी संवाद यात्रेनिमीत्त शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले, दिवाळीनिमित्त वाटलेला आनंदाचा शिधा वेळेत कुणालाही मिळाला नाही. आजही घरोघरी पोचला का, हे तपासावे लागेल. या शिध्यातील तेल निकृष्ट दर्जाचे आहे. ते लोकांनी दिव्यात घालायला देखील वापरले नाही. साखर काळी आहे. डाळींची गुणवत्ता खालावलेली आहे.’’
राज्यातील शेतकरी बांधवांसह कष्टकरी, तरुण बेरोजगार व सामान्य जनतेची अवस्था अत्यंत बिकट आहे. पण सरकारकडून कुणालाही कसल्याही प्रकारचा दिलासा मिळत नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळोखात गेली असून आत्महत्या वाढत आहेत. अशावेळी सर्वांनीच गांभीर्य बाळगून राजकारण थोडे थांबवून सामान्य घटकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले असताना आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो तर आमच्यावर सरकार लक्ष ठेवून असते. तुम्ही गणपती मंडळात जाता, दांडीयाच्या खेळात जाता, दिवाळीच्या उत्सवात सहभागी होता. मग आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत का पोचू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून, त्यांचा आवाज ऐका, त्यांना दिलासा द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी देणारा वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला गेला. महाविकास आघाडी सरकारने त्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता. आता त्यापाठोपाठ वर्ल्ड ड्रॉप पार्क, मेडिकल डिवाईस पार्क हे प्रकल्पही राज्याबाहेर चालले असून, टाटा एअरबस हा मोठा प्रकल्पही गुजरातला चालला असल्याचे प्रसारमाध्यमातून कळले. डबल इंजिनचे सरकार असताना महाराष्ट्रात उद्योग का येत नाहीत. हे उद्योग महाराष्ट्र सोडून बाहेर जात आहेत, याचाच अर्थ राज्य सरकारचे एक इंजिन निकामी आहे.
- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख