पुणे (Pune) : कोरोना कालावधीत पुणे महापालिकेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना चाचणी किट्स आणि औषधे परस्पर खासगी रुग्णालयांत विक्री करून ८० ते ९० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सतीश बाबूराव कोळसुरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डॉ. आशिष भारती, डॉ. अरुणा सूर्यकांत तायडे आणि डॉ. हृषीकेश हनुमंत गार्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये कोरोनाच्या काळात राज्य सरकारने वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयासाठी कोरोना चाचणीचे किट्स, सॅनिटायझर आणि औषधे उपलब्ध करून दिली होती. परंतु डॉ. भारती यांच्यासह तिघांनी कागदपत्रांमध्ये फेरफार आणि खोट्या नोंदी केल्या. कोरोना चाचणीचे किट्स आणि औषधे वारजे येथील रुग्णालयात वापरल्याचे राज्य सरकार आणि महापालिकेला कागदोपत्री दाखवले. त्यानंतर हे चाचणी किट्स आणि औषधे खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांना विक्री करून ८० ते ९० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार १५६ (३) नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.