पुणे (Pune) : कोरोनामुळे ऑनलाइन कल्चर (Online Work Culture) वाढल्याने तांत्रिक बाबींना असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच देशातील आयटी क्षेत्रातील (Indian IT Industry) नावीन्यता आणि कामाचा व्याप वाढला आहे. त्यातून या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत आहे. त्यात आता रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War Update) सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपमधील आयटी कंपन्यांना मिळणारे अनेक प्रोजेक्ट आता भारतीय कंपन्यांकडे आले आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम झाले आहेत. युद्धाचा दोन्ही देशांना देखील मोठा झटका बसला आहे. या सर्वांचा परिणाम रशिया आणि युक्रेनसह युरोप खंडातील इतर देशांवर तांत्रिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या आयटी क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे युरोपमधील काही आयटी कंपन्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे किंवा त्या कंपन्या इतर देशांतील आयटी कंपन्यांद्वारे त्यांचे प्रकल्प पूर्ण करून घेत आहे. यातील अनेक प्रकल्प सध्या भारत आणि अमेरिकेतून पूर्ण केले जात आहेत. भारतातून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुणे आणि बंगळूर या शहरांना पसंती देण्यात येत आहे. परिणामी, या दोन्ही आयटी हबमधील प्रकल्पांची संख्या वाढली आहे. मोठ्या संख्येने प्रोजेक्ट येत असल्याने आयटीयन्सला कामावर घेण्याची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
वैयक्तिक पद्धतीनेही मिळतेय काम
युरोप खंडासह इतर अनेक देशांतून भारतातील आयटीयन्सला वैयक्तिकरीत्या देखील प्रोजेक्ट दिले जात आहे. परदेशात काम करीत असलेल्या मात्र जास्त कर्मचारी संख्या नसलेल्या कंपन्या देशातील तरुणांना प्रोजेक्ट बेसिसवर नोकरी देत आहेत. त्यासाठी दरमहा किंवा पूर्ण प्रोजेक्टचे पॅकेज ठरवले जात आहे. ही सर्व कामे परदेशातील कंपन्यांकडून देशातील आयटीयन्सकडून करून घेतली जात आहेत. अशाप्रकारे काम करणाऱ्या आयटीयन्सचा टक्का गेल्या दीड वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातील अनेकांना युरोपीय देशांकडून काम मिळत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम युरोप खंडातील आयटी क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे तेथील आयटीयन्स आणि प्रोजेक्ट देखील इतर देशांत जात आहे. यातील अनेक प्रोजेक्ट आता पुण्यातून पूर्ण केले जात आहेत. आमच्या कंपनीला देखील रशियामधील एका आयटी कंपनीने प्रोजेक्ट दिला आहे. जो पूर्वी रशियामध्ये केला जात होता.
- राजेश आहुजा, आयटी कंपनीचे संचालक