पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने (PMC) १९३ कोटींची अल्प मुदतीचे टेंडर काढले आहे. यामध्ये शहरातील प्रमुख ५० रस्ते विविध १४० ठिकाणी खरडून काढून पूर्णपणे डांबरीकरण केले जाणार आहे, तर काही सिमेंटचे रस्ते असून, त्यावर सहा इंचाचा नवा थर टाकला जाणार आहे. या रस्त्यावर भविष्यात कोणतेही खोदकाम होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी, मोबाईल केबल यासह आदी कारणांमुळे रस्त्यांवर वारंवार खोदकाम झाले. त्यानंतर खड्डे सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून बुजविण्यात आले, पण हे काम व्यवस्थित न केल्याने रस्ते खचले आहेत. त्याठिकाणी वारंवार सिमेंट व डांबर टाकल्याने रस्ते समपातळीत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय, शहरात कायम वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनावर पुणेकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, शहरातील रस्त्यांची स्थिती अद्यापही खराबच आहे.
शहरात २०२३ मध्ये ‘जी २०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. परदेशातील मंत्री, बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने रस्ते सुस्थितीत आणणे व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पथ विभागाने केलेल्या सर्वेक्षणात संपूर्ण शहरात ५०० कोटींचे रस्ते डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५० रस्ते, १४० ठिकाणी व १४० किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १९३ कोटी ४७ लाख ११ हजार ६८६ रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी टेंडर मागविले असून, पुढील १५ दिवसांत टेंडर प्राप्त झाल्यानंतर त्यांची कागदपत्रांची तपासणी व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लगेच डांबरीकरण सुरू होईल. पुढील सहा महिन्यांत हे सर्व काम संपणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील १९३ कोटींचे काम केले जाणार आहे. पुढील १५ दिवसांत उर्वरित दोन टप्प्यांच्या सुमारे ३०० कोटी रुपयांचे टेंडर निघणार आहेत.
पुढील १५ वर्ष रस्ते चांगले राहतील. ज्या ठिकाणचे डांबरी रस्ते खराब झाले आहेत, तेथील भाग खरडून काढून डांबरीकरण केले जाईल. हे सर्व काम चांगल्या गुणवत्तेने झाले पाहिजे, यासाठी लक्ष ठेवले जाणार आहे. ही कामे त्रयस्थ संस्थेकडून तपासून घेतले जातील.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका