पुणे (Pune) : पुण्याहून विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर धुक्याचा कोणताही परिणाम होणार नाही. याचे कारण रेल्वे प्रशासनाने पुण्यातील रेल्वेचालकांकडे धुक्याचे अडथळा दूर करणारी उपकरणे (फॉग पास डिव्हाईस) दिली आहेत. त्यामुळे दृश्यमानता कमी असली तरी रेल्वेचालकाला ५०० मीटर अलीकडेच सिग्नलची स्थिती समजेल.
हे उपकरण इंजिनमध्ये ठेवण्यात येते. धुक्यात चालकांना सिग्नल दिसण्यात अडचण येते तेव्हा प्रवासी सुरक्षेसाठी हे उपकरण काम करेल. हे उपकरण ‘जीपीएस’ प्रणालीनुसार चालते. कर्मचारी असलेली आणि नसलेली रेल्वेची फाटके, वेगावर कायमस्वरूपी निर्बंध असलेले विभाग आदींबाबतची माहितीही रेल्वेचालकांना ५०० मीटर आधी उपकरणावर दिसेल. त्यामुळे गाडीचा वेग कमी करायचा की नाही हे त्यांना ठरविता येईल.
धुक्यामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने गाड्या उशिराने धावतात. अनेकदा गाड्या रद्दही कराव्या लागतात. याचा प्रवाशांना फटका बसतो.
उत्तर भारतातील दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सुरवातीला हे उपकरण बसविण्यात आले. त्याचा चांगला परिणाम झाला. त्यामुळे आता रेल्वे मंडळाने पुणे विभागाला अशी ८० उपकरणे दिली आहेत.
उपकरणाची वैशिष्ट्ये
- आकाराने लहान
- वजन केवळ दीड किलो
- गाडीचा वेग ताशी १६० किलोमीटर असली तरी कार्यरत राहणार
- मेल एक्स्प्रेस, सुपरफास्टसह डेमू, मेमू, ईएमयू आदी गाड्यांमध्ये चालणार
- इंजिन डिझेल किंवा विद्युत असले तरीही चालणार
- १८ तासांचा ‘बॅटरी बॅकअप’
रेल्वे मंडळाने उपकरणाच्या वापराबाबत सूचना दिल्या आहेत. पुणे विभागाने ८० गाड्यांत उपकरणाचा वापर सुरू केला आहे. हे उपकरण रेल्वेचालकाकडे दिले जाते. त्यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित होतो.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे