Pune News पुणे : देशांतर्गत प्रवासासाठी भारतीयांकडून रेल्वेला (Indian Railway) मोठ्या प्रमाणात पंसती दिली जाते. कमी खर्चात होणारा प्रवास म्हणूनही अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.
खर्च कमी आणि दगदगही कमी होत असल्याने अनेक जण रेल्वेने प्रवास करत असले तरी आता काळानुसार रेल्वेने काही बदल करण्यास सुरवात केली आहे. त्यापैकी काही बदलांचा रेल्वे प्रवाशांवर थेट परिणाम होताना दिसून येत आहे.
ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढल्यामुळे रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवरील गर्दीही कमी झालेली दिसते आहे. अनेकदा प्रवाशी प्रत्यक्ष आरक्षण केंद्रावर जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाइन तिकीट काढण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकदा रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवरील काही खिडक्या बंद ठेवाव्या लागत आहेत.
ऑनलाइन तिकीट काढण्याचे प्रमाण खूप वाढल्याने पुण्यासह देशातील रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्रातील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. पुणे स्थानकाच्या आरक्षण केंद्रावरील निम्म्याहून अधिक खिडक्या गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत.
त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने बंद असलेल्या खिडक्यांच्या व समोरच्या मोठ्या जागेत लाउंज बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध जागेचा चांगला वापर होणार आहे. शिवाय यातून रेल्वेला उत्पन्न देखील मिळणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना तासानुसार पैसे द्यावे लागणार आहेत.