पुणे (Pune) : पुण्याहून मुंबईच्या (Pune To Mumbai Trains) दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बचत होणार आहे. कारण आता मालगाडीसाठी प्रवासी गाड्यांना लूप लाईन (Loop Line) वरून जावे लागणार नाही.
पुणे रेल्वे प्रशासन तीन स्थानकावर ‘लाँग लूप लाईन’ तयार करीत आहे. ही लाईन तयार झाल्यावर मालगाडी थांबेल आणि प्रवासी रेल्वे गाड्या मेन लाइनवरून धावतील. त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळेत किमान दहा मिनिटांची बचत होईल. देहूरोड, मळवली आणि दापोडी या तीन स्थानकांवर सुमारे १४०० मीटर लांबीची ‘लाँग लूप लाइन’ टाकली जाणार आहे.
पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांची संख्या आहे. क्षमतेचे पेक्षा जास्त रेल्वेची वाहतूक होत असल्याने प्रवासी व मलगाड्यांच्या वेळापत्रकावर रोजच परिणाम होतो आहे. अनेकदा मेन लाईन वरून मालगाडी धावत असल्याने प्रवासी गाड्यांना लूपच्या माध्यमातून पुढे आणले जाते. अशा वेळी रेल्वेचा वेग खूपच कमी होतो. त्यामुळे प्रवासी गाड्यांना उशीर होतो.
हे टाळण्यासाठी ऑपरेटिंग विभाग आता देहूरोड, मळवली आणि दापोडी या तीन स्थानकावरील लूप लाइनचा विस्तार करणार आहे. लूप लाइनची लांबी वाढल्याने मालगाडीचे ४८ वाघिणी थांबू शकतात. परिणामी प्रवासी गाड्यांना मेन लाइन वरून धावण्यास मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील तीन स्थानकावरील लूप लाइनचा विस्तार केला जाणार आहे. लाँग लूप लाइनमुळे प्रवासी रेल्वेच्या गाड्यांच्या वेळेत बचत होणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.
- इंदुराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे