पुणे (Pune) : लोकल, डेमू, पॅसेंजरच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या संख्येत वर्षात दीड कोटीपेक्षा जास्त प्रवाशांची संख्या घटली आहे. (Pune Railway Station)
कोरोनापूर्वी २०२० मध्ये सबर्बन व नॉन सबर्बन असा मिळून वर्षाला ६ कोटी ६४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तथापि, यंदाच्या वर्षी ही संख्या ३ कोटी ४१ लाख इतकी झाली आहे. तब्बल ३ कोटी २३ लाख प्रवाशांची संख्या घटली. तरीही प्रवासी उत्पन्नात मात्र मोठी वाढ झाली आहे. कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिटांवर लावलेले निर्बंध व पॅसेंजर रेल्वेला दिलेला एक्स्प्रेस रेल्वेचा दर्जा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनोचा प्रभाव कमी होत असताना रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे सेवा सुरू केल्या. हे करीत असताना आधी केवळ आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्यास परवानगी दिली. २९ जून २०२२ पासून मात्र जनरल तिकिटांची विक्री सेवा सुरू केली. याच काळात पुण्याहून-लोणावळ्यासाठी लोकलची सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली.
लोकल सेवा पूर्वपदावर आली असली तरीही प्रवासी संख्येत मात्र मोठी घट झालेली आहे. २०२० चा विचार करता, आरक्षित तिकिटे धरून पुणे विभागातून तब्बल ७ कोटी ७१ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून ८७३ कोटी १४ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले. मार्च २०२३ मध्ये ४ कोटी ६९ लाख प्रवाशांनी प्रवास केला यातून १ हजार २४ कोटी ४६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
ही आहेत कारणे...
- रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिटावर निर्बंध लावले
- केवळ आरक्षित तिकीटधारकांना प्रवास करण्यास मुभा दिली
- जनरल तिकिटाच्या दराच्या तुलनेत आरक्षित तिकिटांचे दर जास्त आहेत.
- पॅसेंजर रेल्वेला एक्सप्रेसचा दर्जा दिला. त्यामुळे तिकीटदरात वाढ झाली.
- परिणामी प्रवासी उत्पन्नात वाढ
जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्याची संख्या कमी झाली आहे, तरीही प्रवासी उत्पन्नात मात्र मोठी वाढ झाली आहे. आरक्षित तिकिटांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न सर्वाधिक आहे.
- डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे