पुणे (Pune) : रेल्वे प्रवाशांना जुन्या मालधक्क्यातून थेट पुणे स्थानकावर जाता-येता येणार आहे. त्यामुळे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गर्दी कमी होईल. पुणे विभागाने तसा निर्णय घेतला असून रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाला (आरएलडीए) स्थानक विकास प्रकल्पात हा बदल समाविष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुणे स्थानकाचा विकास झाल्यावर प्रवाशांना मालधक्क्यातून प्रवेश मिळेल.
रेल्वे बोर्डाने काही वर्षांपूर्वी पुणे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्याची जबाबदारी पूर्वी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाकडे (आयआरएसडीसी) सोपविण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून ही जबाबदारी ‘आरएलडीए’कडे देण्यात आली. ‘आरएलडीए’कडून गेल्या दोन वर्षांपासून या कामाचे आरेखन सुरु आहे. यात मालधक्क्याच्या बाजूकडील प्रवेशद्वाराचाही समावेश झाला आहे.
नवे फलाट जुन्या मालधक्क्यात
पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करताना त्याची क्षमता देखील वाढविण्यात येणार आहे. यात मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डामध्ये नवीन फलाट केले जाणार आहेत. प्रत्येकी ७५० मीटर लांबीचे चार फलाट व ‘लोकल’साठी प्रत्येकी सुमारे ६०० मीटर लांबीचे दोन नवे फलाट बांधण्यात येतील. जुन्या मालधक्क्याच्या जवळील जीएल (गुड्स लूप) लाईनच्या जागेत नवे फलाट बांधले जातील. पुणे स्थानकावर सद्यःस्थितीत सहा फलाट असून आणखी सहा फलाट बांधण्याचा प्रस्ताव आहे. १२ पैकी १० फलाट मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी वापरले जातील, तर दोन फलाट ‘लोकल’साठी वापरण्याचे नियोजन आहे.
फलाट वाढविणे गरजेचे
सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरील पुणे हे एक प्रमुख स्थानक आहे. हे स्थानक व्यस्त रेल्वे मार्गावर येत असल्याने येणाऱ्या काळात तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांनी पुण्याला जोडले जाईल. सध्या पुणे ते वाडी दरम्यान या मार्गिकांच्या कामासाठी सर्वेक्षण सुरु आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान सुद्धा तिसरी व चौथी मार्गिका भविष्यात टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. हे लक्षात घेऊनच रेल्वे प्रशासनाने फलाटांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फलाटांची लांबी व संख्या वाढल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
जुन्या मालधक्क्याच्या जागेत नवीन फलाटांचे काम होणार आहे. त्यासाठी मालधक्क्याच्या जागेतून प्रवाशांना प्रवेश मिळेल. तसेच त्यांना तेथून बाहेरही पडता येणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरण स्थानक विकासाचे काम करणार आहे. त्यांच्या आराखड्यात हा बदल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे