पुणे (Pune) : पावसाने कंबरडे मोडलेल्या पुणेकरांना यंदाची दिवाळी सुखात जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे रुप येत असल्याने हैराण झालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीनेही पुरते छळले आहे. दिवाळीची सुरवातच पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी आणि पावसाने झाली आहे. पाऊस आणि वाहतूक कोंडीच्या त्रासाला पुणेकर अक्षरश: वैतागला आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पुणे - सोलापूर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आला. हडपसर पुलावर एक ते दीड तास अनेक वाहने अडकून पडली होती.
आजही दिवाळीच्या तयारीसाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना पुणे - सोलापूर रस्त्यावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना सकाळचा महत्त्वाचा वेळ वाहतूक कोंडी अडकण्यातच गेला. हडपसर पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता.
सकाळी घराबाहेर पडल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेक नागरिकांची कामे खोळंबली. थोडे अंतर कापायलाही तास - दीड तासाचा वेळ लागत होता. वाहतुकीचे नियम पाळण्याची अनेक पुणेकरांना सवय नसल्यानेही कोंडी वाढत जाते. एकदा वाहतूक कोंडी झाली की नियम मोडण्याकडे अनेकांचा कल असतो, त्यामुळे कोंडीत अधिक भर पडत जाते.