पुणे (Pune) : खडकवासला धरण चौकात मुख्य सिंहगड रस्त्याची (Sinhgad Road) एक बाजू ऐन सुट्टीच्या दिवशी खोदून ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या ड्यूटीवर असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. परिणामी पर्यटक व स्थानिक नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडले. खडकवासला धरण चौकापासून दोन्ही बाजूंना एक ते दीड किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे सातत्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शनिवार व रविवार पर्यटकांची संख्या जास्त असल्याने रस्ता खोदून ठेवू नये किंवा काम सुरू ठेवू नये, याबाबत पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलेले असताना ठेकेदाराने अचानक शुक्रवारी रात्री अर्धा रस्ता खोदून ठेवला. परिणामी अगोदरच अरुंद असलेला रस्ता सध्या अर्धाच वापरात असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यातच हवेली पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचा बंदोबस्त असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी उपस्थित नव्हते. खडकवासला धरण चौकापासून सिंहगडाकडे व खडकवासला बाह्यवळण रस्ता आणि गावातील मुख्य रस्ता या वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाल्याचे चित्र दिसत होते.
सुट्टीच्या दिवशी काम करू नका, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. मी स्वतः, दोन सहायक पोलिस निरीक्षक व दहा पोलिस कर्मचारी निवडणूक बंदोबस्तासाठी आहोत. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी जाण्यास सांगितले आहे.
- सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक, हवेली ठाणे, पुणे ग्रामीण
शनिवार व रविवार पर्यटक मोठ्या संख्येने येतात, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांना असूनही रस्ता खोदून ठेवण्यात आला. इतर दिवस ठेकेदार कोठे होता? रस्ता खोदलेला असताना वाहतुकीबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही. वाहतूक कोंडीमुळे गाव ठप्प झाले.
- सौरभ मते, स्थानिक रहिवासी