Pune: 'या' उपाययोजनांंमुळे तरी नवले पुलावरील अपघात थांबतील का?

Navale Bridge
Navale BridgeTendernama
Published on

पुणे (Pune) : नवले पुलाजवळील (Navale Bridge) अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी त्या ठिकाणी जड वाहनांची वेगमर्यादा कमी करणे, जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन, ब्रेक निकामी झालेल्या वाहनांनासाठी ‘इमर्जन्सी एस्केप प्लॅन’ अंतर्गत बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे, वाहने न्यूट्रल केल्यास थेट गुन्हे दाखल करणे, पोलिस चौकी उभारणे, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे आदी उपाययोजना राबविण्याची भलीमोठी यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली.

Navale Bridge
Nashik : सिंहस्थापूर्वी होणार चार हजार कोटींचे भूसंपादन

पुणे-बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ वारंवार होत असलेल्या अपघातांच्या अनुषंगाने त्यामागची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या. या वेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत परिवहन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. एनएचएआय, पोलिस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन संस्थेने सुचविलेल्या विविध उपाययोजनांवर या वेळी चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या या लांबीत वाहतूक नियमांचे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलिसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.

Navale Bridge
Virar-Alibaug Corridor : पहिल्या टप्प्यात 1062 हेक्टर भूसंपादन

ही आहेत अपघाताची कारणे

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्‍यक उष्णता व दाब निर्माण होऊन ब्रेक काम करेणासे होतात. हे देखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरू शकते, असे या वेळी सांगण्यात आले.

जडवाहनांची वेगमर्यादा घटविणे आवश्‍यक

कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटवणे आवश्‍यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने ट्रक मालक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

या उपाययोजना तातडीने करण्यात येणार

कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्‍घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामिनारायण मंदिर ते दरी पूल या दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीने मदत देण्यासाठी पोलिस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्‌स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

Navale Bridge
Maharashtra : स्वस्तातील वाळू पावसाळ्यानंतरच मिळणार कारण...

वेग नियंत्रण केंद्र

जडवाहने आणि दुचाकी यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहेत. बाह्यवळण मार्गावर ही दोन्ही वाहने एकत्र येऊ नयेत म्हणून वेग नियंत्रण केंद्र (सेपरेशन अँड स्पीड कंट्रोल प्लाझा) उभारण्यात येणार आहे. हे केंद्र कुठे उभारायचे ते ठिकाण लवकरच निश्चित केले जाणार आहे. तसेच एनएचएआयकडून मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांत दरीपूल ते नवले पूल या दरम्यान डिजिटल फलक लावण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

जागेवर कारवाई करणार

दरीपूल ते नवले पूल या दरम्यान वाहने न्युट्रल करण्यात येतात. त्यामुळे ब्रेक निकामी होत नसले, तरी त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे या टप्प्यात वाहने न्यूट्रल करता येणार नाहीत. तसेच या दरम्यान जड वाहनांसाठी आता ६० ऐवजी ४० किमी प्रतितास एवढा कमी करण्यात येणार आहे. कात्रज नवीन बोगद्यापासून २००-३०० मीटरवर पोलिस चौकी उभारण्यात येईल.

खेड-शिवापूर पथकर नाका आणि पोलिस चौकी येथे अपघात होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याबाबत उद्‍घोषणा करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दोन वाहने तैनात असतील. या वाहनांतून वेग नियंत्रण ओलांडण्यांवर, मार्गिका मोडणाऱ्यांवर, वाहने न्यूट्रल करणाऱ्यांवर जागेवर कारवाई केली जाणार आहे.

Navale Bridge
Nashik : स्मार्टसिटीच्या 1250 कोटींच्या कामांना वर्षभराची मुदतवाढ

या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन करावयाच्या उपाययोजनांतर्गत कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांची बैठक होणार आहे.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com