पुणे (Pune) : पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या रस्त्यांमध्ये सिंहगड रस्त्याचा समावेश आहे. राजाराम पूल ते वडगाव उड्डाणपुलाच्या दरम्यान वाहन चालकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. कॅनल रोडवरून वाहतूक सुरू झाली असली तरी त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी कमी झालेली नाही.
राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल सुरू झाला असला तरी त्यामुळे कोंडी कमी होण्यास फारशी मदत झाली नसल्याचे चित्र आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले. पुढील वर्षी मार्ग अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशातच आता सिंहगड रस्त्यावरून जाणाऱ्या मेट्रो मार्गाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे उड्डाणपूल आणि मेट्रो अशी दुहेरी सोय उपलब्ध झाल्यास सिंहगड रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
‘खडकवासला-हडपसर-खराडी’ आणि ‘नळस्टॉप-वारजे-माणिकबाग’ या दोन नव्या मेट्रोच्या मार्गांना राज्य सरकारने सोमवारी मंजुरी दिली. दोन्ही मार्गिकांवर २८ स्थानकांची निर्मिती केली जाणार असून नऊ हजार ८९७. १९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सोमवारी पाठविला आहे. केंद्राची मान्यता मिळताच मेट्रोच्या मार्गिकांच्या कामाला सुरुवात होईल.
दोन वर्षांपूर्वी मेट्रो प्रशासनाने पुणे महापालिकेला मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचा आराखडा सादर केला होता. याला पुणे महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला सोमवारी मंजुरी मिळाली. केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी आराखडा पाठविला असून येत्या चार ते पाच महिन्यांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर पाच वर्षांत या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.
असे आहेत मार्ग...
१. खडकवासला-हडपसर-खराडी
एकूण २५.५१८ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असेल. या दरम्यान सुमारे २२ स्थानकांची निर्मिती केली जाणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासाठी आठ हजार १३१.८१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
स्थानके : खडकवासला, दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु. ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज् चौक, पुणे कँटोन्मेंट बोर्ड, रेस कोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ गेट, मगरपट्टा मेन गेट, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथनगर, खराडी चौक.
२. नळस्टॉप-वारजे-माणिकबाग
एकूण ६.११८ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असेल. या दरम्यान सहा स्थानकाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी सुमारे एक हजार ७६५.३८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. काम पूर्ण होण्यासाठी किमान चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
स्थानके : पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे व दौलतनगर.
मार्गिकेचा प्रवास :
८ ऑगस्ट २०२२ : सर्वंकष आराखडा पुणे महापालिकेला सादर
२७ सप्टेंबर २०२२ : महापालिकेला प्रकल्पाचे सादरीकरण
९ जानेवारी २०२३ : सुधारित दुरुस्त्यांसह महापालिकेला सादर केलेला आराखडा
१८ ऑगस्ट २०२३ : राज्य सरकारला आराखडा सादर
१४ ऑक्टोबर २०२४ : राज्य सरकारची मंजुरी
सिंहगड रस्त्यावरून जाणाऱ्या खडकवासला ते हडपसर मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली. या मेट्रोसाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची तोडफोड करावी लागणार नाही.
- माधुरी मिसाळ, आमदार
या मेट्रोमुळे सिंहगड रस्त्यावरील मोठी वाहतूक कोंडी सुटेल. कर्वे रस्ता, एनडीए रस्ता, सिंहगड रस्ते जोडले जाणार असल्याने वाहतुकीचा नवा पर्याय मिळून नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होईल.
- भीमराव तापकीर, आमदार