पुणे (Pune) : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणारा गणपती माथा ते शिंदे पूल हा एनडीए गेटकडे जाणारा रस्ता कायमच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या वाहनांनी गजबजलेला असतो. त्यामुळे येथून जाताना वाहनचालकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण विभाग व मध्यवर्ती पथकाकडून अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
या कारवाईत साधारण १६ व्यावसायिक वाहने, सहा बिगरटप हातगाडी, एक टप हातगाडी, तीन नग होजिअरी, तीन लोखंडी काउंटर, तीन गॅस सिलिंडर, एक फ्रिज, एक लोखंडी बाकडा व स्टूल, एक छत्री व एक मोठे डिजिटल स्टॅण्ड जप्त करण्यात आले आहे. यावेळी व्यावसायिकांनी केलेल्या विरोधास न जुमानता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे कारवाई केली.
महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक किरण डवरी, राकेश काची, कुणाल मुंडे, राहुल बोकन, राहुल डोके, सचिन जाधव, शिवशंकर वाडीकर, सागर विभूते व प्रथमेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
परिसरातील अनेक व्यावसायधारक रस्ते, फुटपाथ व सोसायटीच्या बाजूला असलेल्या जागेत अनधिकृतरीत्या व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. पुढील काळात आम्ही संयुक्तरित्या कारवाईमध्ये सातत्य ठेवणार आहोत. वांरवार अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
- अजय गोळे, वरिष्ठ अतिक्रमण निरीक्षक, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय