पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शिवाजीनगरकडून औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड शहर, हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी हे बदल केले आहेत.
शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्याने औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड, हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी रेंजहिल्स कॉर्नर येथील एबील हाऊस येथून उजवीकडे वळावे. रेंजहिल्स, सिंफनी चौक, साई चौक, खडकी, डॉ. आंबेडकर चौकमार्गे बोपोडी, स्पायसर चौकमार्गे, ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे.
औंध गावातून शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक, खडकी, रेंजहिल्स चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
एबील हाऊस चौकात रेंजहिल्सकडून येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. गणेशखिंड रस्त्यावरील संगण्णा धोत्रे रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. गणेशखिंड रस्त्यावरील खाऊ गल्लीमार्गे ओम सुपर मार्केटकडे जाणारी वाहतूक एकेरी केली आहे.
सिम्बायोसिस महाविद्यालयाकडून खाऊगल्लीतून गणेशखिंड रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. कोंडी कमी करण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापरा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
खासगी प्रवासी बसच्या वाहतुकीत बदल
विद्यापीठ चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संचेती हॉस्पिटल चौकातून गणेशखिंड रस्त्याने पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, औंधकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतुकीच्या वेळेत बदल केला आहे.
गणेशखिंड रस्त्यावर सकाळी आठ ते रात्री साडेदहा या वेळेत प्रवासी बस वाहतुकीस बंदी घातली आहे. खासगी बसचालकांनी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून हॅरिस पूलमार्गे पुणे शहरात यावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.