पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असताना रस्त्यांवरील अतिक्रमण, विजेचे खांब, अर्धवट ताब्यात आलेली जागा यासह अन्य कारणांमुळे रस्त्यांचा काही भाग मोठा असला, तरीही मध्येच अडथळा निर्माण झाला आहे. वाहतुकीचा खोळंबा करणारे असे बॉटलनेक रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस व इतर संबंधित संस्थांची एकत्र समिती स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्धवट असलेले रस्ते एकमेकांना जोडून पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या मिसिंग लिंक शोधण्यासाठी सल्लागार नियुक्त केला असून, हे काम पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले रस्ते मोठे व अतिक्रमणमुक्त, अडथळेमुक्त केले तर वाहतूक सुरळीत व गतिमान होण्याची शक्यता आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे नुकतीच एक बैठक घेतली. त्यामध्ये बॉटलनेक काढण्यासाठी खास समिती स्थापन केली जावी. यामध्ये पथ विभाग, बांधकाम, उद्यान, विद्युत, भूसंपादन, पीएमपी, वाहतूक पोलिस, महावितरण, बीएसएनएल यासह इतर संबंधित संस्थांचा समावेश असावा. संबंधित विभागांची दर महिन्याला बैठक व्हावी आणि रस्ते, चौक मोठे व्हावेत, अतिक्रमण काढले जावेत. यापूर्वी महापालिकेमध्ये या प्रकराची समिती होती, पण प्रशासकीय अनास्थेमुळे या समितीचे काम काही वर्षांपूर्वी बंद पडले. ही समिती पुन्हा गठित करून काम सुरू करण्यासाठी चर्चा करण्यात आली. पुढील काही दिवसांत यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून ४१ चौकांची यादी
वाहतूक पोलिसांनी कोंडीत भर घालणाऱ्या ४१ चौकांची यादी सादर करून, त्यावर उपाययोजना करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, अभियंता प्रतीक्षा काटकर यांनी प्रत्येक चौकाचा अभ्यास करून त्यावर उपाययोजनांचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार चौक कोंडीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
शहरातील रस्त्यांची लांबी ः १४०० किमी
विकास आराखड्यातील रस्त्यांच्या मिसिंग लिंक ः ३९०
मिसिंग लिंकचे एकूण अंतर ः २७३ किमी
वाहतूक कोंडी होणारे चौक ः ४१
शहरातील वाहनांची संख्या ः ४६ लाख
वाहनांचा सरासरी ताशी वेग ः १८ ते २० किमी
अपेक्षीत सरासरी ताशी वेग ः ४० किमी