पुणे (Pune) : पुणे-पानशेत रस्त्यावरील मागील दोन वर्षांपासून खचत असलेला पूल कोसळण्याच्या स्थितीत असून, त्याबरोबर पानशेतसह परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वीजवाहक तारांचे खांबही कोसळ्याच्या स्थितीत आहेत. पूल कोसळल्यास वाहतूक तर बंद होणार आहेच शिवाय हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठाही खंडित होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना (PWD) दिल्या आहेत.
पुणे-पानशेत रस्ता हा हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. स्थानिकांसह पर्यटकांचीही या रस्त्यावरून रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. सध्या खचलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्पुरती भर टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवलेली आहे. मात्र दिवसेंदिवस पुलाचा सुमारे दोनशे फूट लांबीचा व पंधरा ते वीस फूट रुंदीचा भाग अधिकाधिक खाली घसरत चालला आहे.
या भागावर उच्चदाब वीज वाहक तारांचे दोन खांब असून, तेही खचत चालले आहेत. त्यामुळे सदर पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तर तुटणार आहेच शिवाय विजेचीही गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
ज्या ठिकाणी पूल खचला आहे तेथे एक खांब रोवून तारांना आधार दिला आहे. आणखी एकदा प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
- अतिष इंगळे, सहाय्यक अभियंता, महावितरण, खानापूर
खचलेल्या पुलाच्या जागी नवीन पूल करण्याबाबत वेगाने कार्यवाही सुरू आहे. निधीला मंजुरी मिळालेली असून टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- बाप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
खचलेल्या पुलाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. लवकरच भेट देऊन पाहणी करणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे