पुणे (Pune) : पीएमपीचा (PMPML) संचित तोटा सुमारे ७०० कोटीइतका आहे. दैनंदिन उत्पन्न व खर्च यात मोठी तफावत आहे. बस बंद पडण्याचे प्रमाणही अधिक. खासगी ठेकेदारांच्या वाढत्या तक्रारीही जास्त आहे, ही सारे आव्हाने तर आहेतच. मात्र, असे असले तरीही पीएमपीची सेवा ही प्रवासीभिमुखच राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन निर्णय घेतला जाईल, असा निर्धार पीएमपीचे नवे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केला.
ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी प्रवासी सेवेत येणारे अडथळे याबाबत विचार विनियम करण्यास सुरूवात केली. गेल्या काही दिवसांत पीएमपीच्या विशेषतः ठेकेदारांच्या बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण ४० ते ४५ टक्के इतके आहे. बस बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे बसच्या देखभाल, दुरुस्तीकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. तसेच बसची संख्या तुलनेने कमी आहे. तेव्हा उपलब्ध बसचा अधिकाधिक वापर करण्याला प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारांच्या बसविषयी येणाऱ्या तक्रारींना गांभीर्यपूर्वक घेणार असल्याचे बकोरिया यांनी सांगितले.
कर्मचारीही खूश
दिवाळी तोंडावर आल्याने लवकरात लवकर बोनस मिळावा म्हणून या मागणीसाठी कर्मचारी सोमवारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. दुपारी काही मंडळी पीएमपीच्या मुख्यालयाजवळ जमली देखील होती. दरम्यान पी.एम.टी कामगार संघच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान ८.३३ टक्के व बक्षीस १९ हजार रुपये सायंकाळी कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा झाले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ओमप्रकाश बकोरिया यांना भेटून आभारही मानले.