पुणे (Pune) : आचारसंहितेमध्ये कोणतीही नवीन टेंडर (Tender) प्रक्रिया राबविण्यात येणार नाही. तसेच स्वीकारलेल्या टेंडरला मंजुरीदेखील दिली जाणार नसल्याची माहिती ‘पीएमआरडीए’चे (PMRDA) आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.
१५ ऑक्टोबर रोजी साडे तीन वाजण्यापूर्वी ज्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्याचीच कामे मार्गी लागतील, असेही आयुक्त म्हसे म्हणाले.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. आचारसंहितादेखील लागू झाली आहे. त्यामुळे शासकीय नवीन कामांना काही काळ स्थगिती मिळणार आहे. ‘पीएमआरडीए’च्या अर्थसंकल्पाला नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार अनेक वर्षे रखडलेल्या कामांना गती प्राप्त झाली होती. नुकतीच सेक्टर १२ येथील घरांच्या सोडतीचा मुहूर्तदेखील काढण्यात आला. ही कामे आता नोव्हेंबरपर्यंत थांबणार आहेत.
काही कामांसाठी ‘पीएमआडीए’च्यावतीने टेंडर काढण्यात आले होते. अनेकांनी टेंडर भरले होते. मात्र, त्याला मंजुरी देण्यात येणार नसल्याचे ‘पीएमआरडीए’च्यावतीने सांगण्यात आले. तसेच नवीन कोणतेही टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार नाही. याबरोबरच आचार संहितेपूर्वी ज्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तीच कामे मार्गी लागणार आहेत.
आचारसंहिता लागू झाली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जाईल. नवीन कोणतेही टेंडर काढणार नाही किंवा आलेले टेंडरही मंजूर केले जाणार नाही. आचारसंहितापूर्वी ज्या कामांना मंजुरी दिलेली आहे, अशीच कामे केली जातील.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए.