पुणे (Pune) : रुळांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी न राहण्याच्या सूचना देशातील सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विभागाला ब्लॉक घेणे आवश्यक असेल तर त्यांना तो आपत्कालीन परिस्थितीनुसार देण्याची सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. (Railway Infra)
बालासोर रेल्वे अपघातानंतर (Balasor Railway Accident) रेल्वे बोर्ड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे रेल्वे प्रशासन २६ आठवड्यांचा कृती आराखडा तयार करीत आहे.
बालासोर रेल्वे अपघातानंतर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. गुरुवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग यांनी सिग्नलींग आणि टेलिकॉम, टीआरडी विभागाच्या अधिकाऱ्यांची व अभियंत्याची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी सुरक्षेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
ऐनवेळी ब्लॉक घ्यावे लागले तरी चालेल, गाड्यांना थोडा उशीर झाला तरीही चालेल पण प्रवासी सुरक्षितता महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ती सुविधा दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत गाड्या मॅन्युअली जाणार नाहीत. जो पर्यंत इंटरलॉकिंगचे काम पूर्ण होणार नाहीत. तोपर्यंत गाड्या धावणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
पुण्यासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कार्यालयात बसून न राहता स्थानक, यार्डवर जाण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातील अधिकारी स्थानकावर परीक्षण करताना दिसून येत आहेत.
गुरुवारी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे रेल्वेत प्रवाशांची तिकिटे व सामान तपासात होते, तर सहायक परिचालन व्यवस्थापक सचिन पाटील यार्डात जाऊन मालगाडीला इंजिन व वॅगन जोडण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते.
बालासोरसारखा अपघात पुणे विभागात व देशात पुन्हा होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. प्रवासी सुरक्षेशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यावर भर दिला जात आहे.
- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे