पुणे (Pune) : यंदाच्या उन्हाळ्यात विमानप्रवास तब्बल ६० टक्क्यांनी महागला आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानांचे तिकीट दर पाहून एकूणच घाम फुटणार आहे. फ्लाइटची संख्या कमी आणि मागणी जास्त असल्याचा हा परिणाम आहे. याचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे. पुण्याहून सिंगापूरपेक्षा श्रीनगरला जाणे महागात पडते आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांना दरवाढीचे ‘चटके’ सहन करावे लागणार आहेत.
श्रीनगर, लेह, लडाख, पोर्ट ब्लेअर, अंदमान आदींसारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, मात्र त्या तुलनेत विमानांची संख्या कमी आहे. शिवाय मागच्या वर्षीच्या तुलनेत देशातील काही प्रमाणात विमानांचे मार्गदेखील कमी झाले आहेत, तसेच अन्य पर्यटन स्थळीदेखील जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. सामान्य दराच्या तुलनेत सुमारे ५५ ते ६० टक्के दरवाढ केली आहे.
असे आहेत दर...
पुणे ते सिंगापूर : १९ हजार ५००
पुणे ते श्रीनगर : २५ ते ३० हजार
(हे दर प्रति व्यक्तीचे परतीच्या प्रवासासासह (राऊंडेड) तिकिटाचे आहेत.)
पुणे ते अयोध्या : ९ ते १० हजार
पुणे ते दिल्ली : ६ हजार
वाराणसी : १० हजार
जयपूर : ६०००
(हे दर प्रतिव्यक्ती एकेरी मार्गाचे आहेत)
तिकीट दरवाढीची कारणे
- फ्लाइट कमी अन प्रवासी जास्त
- देशात एकूण विमानांची संख्या ७१३, पैकी २०० विमाने सेवेत नसलेली (ग्राऊंडेड)
- प्रवासी वाहतुकीत विमानांची संख्या कमी
- फ्लाइटची संख्या कमी व मार्ग कमी
- देशात मागील वर्षी ६०२ मार्ग होते, आता ५८३ मार्ग
देशांतर्गत विमान प्रवासाकडे प्रवाशांचा ओढा अधिक आहे, मात्र त्या मार्गावर फ्लाइटची संख्या कमी आहे. परिणामी विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर वाढवले आहेत. सामान्य तिकीट दरांच्या तुलनेत ६० टक्के तिकीट दर वाढविले आहेत. सरकारने विमान तिकिटांच्या दरावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल्स एजन्सी, पुणे