पुणे (Pune) : कर्वेनगरला निळ्या पूररेषेच्या आत राडारोडा टाकल्याचे समोर येताच मंगळवारी (ता. १) महापालिकेने जागामालकाला साडेसात लाखांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू, अशी नोटीसही बजावली आहे. तसेच राडारोडा हटविण्यास सांगितले.
मुठा नदीपात्रालगत अनेक ठिकाणी अतिक्रमणे केली आहेत. राडारोडा टाकून मैदान तयार केले जाते, त्याचा वापर पार्किंग किंवा अन्य कारणांसाठी केला जातो. अनेक ठिकाणी निळ्या पूररेषेच्या आत राडारोडा टाकल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. याच कारणामुळे जुलैमध्ये पुण्यात व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मुठा नदीला पूर आला होता. त्यात विठ्ठलनगर, एकतानगरी, निंबजनगर, पाटील इस्टेट, शांतिनगर, येरवडा, पुलाचीवाडीमधील शेकडो घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते.
अतिक्रमणामुळे पूर आल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेने कर्वेनगरच्या बाजूने नदीत टाकलेला भराव काढण्याची मोहीम सुरू केली. सुमारे ३०० ट्रक राडारोडा काढला. तसेच यापुढे भराव टाकू दिला जाणार नाही, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यानंतर जागामालक निळ्या पूररेषेत राडारोडा टाकत आहेत.
असाच प्रकार कर्वेनगरमध्ये सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) उघडकीस आला. त्यानंतर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आणि बांधकाम विकास विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. त्यावेळी संबंधित जागामालकाने ‘भराव माझ्या स्वतःच्या जागेत टाकला आहे. पूररेषेच्या आत भराव नाही,’ असे सांगत विरोध केला. मात्र नकाशावरून तपासले असता निळ्या पूररेषेच्या आत भराव टाकल्याचे समोर आले. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाने जागामालकाला साडेसात लाखांचा दंड ठोठावला. तशी नोटीस दिली आहे.
बांधकाम विभागाने महाराष्ट्र नगररचना नियोजन कायदा कलम ५३ नुसार नोटीस देऊन २४ तासांत राडारोडा काढावा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.
प्रशासनात हवा समन्वय
मुठा नदीपात्रात कर्वेनगरच्या बाजूने राडारोडा टाकण्याचे प्रमाण जास्त आहे. जागामालकांनी पत्रे लावल्याने अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात येत नाही. सिंहगड रस्ता, एकतानगरी भागाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्वेनगरच्या बाजूने नदीपात्रात काय सुरू आहे हे दिसू शकते. त्यामुळे प्रशासनाने समन्वय ठेवल्यास नदीच्या दोन्ही बाजूने होणारे अतिक्रमण रोखणे शक्य आहे.
कर्वेनगरला निळ्या पूररेषेच्या आत राडारोडा टाकल्याप्रकरणी जागामालकाला साडेसात लाखांचा दंड केला आहे. तसेच राडारोडा काढून घेण्यास सांगितले आहे.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका