पुणे (Pune) : राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (MJP) करण्यात येत असलेल्या मांजरी पाणी पुरवठा योजना आता पुणे महापालिकेकडे (PMC) हस्तांतरित करण्यात आली आहे. मांजरी गाव २०२१ मध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने संबंधित योजना महापालिकेकडे आली आहे. योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या अंतर्गत मांजरी पाणी पुरवठा योजनेच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. सध्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, आत्तापर्यंत योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, २०२१ मध्ये मांजरी गाव हे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित योजना देखील महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे निश्चित झाले. दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता पी.. सी. भांडेकर, कार्यकारी अभियंता सुभाष पावरा यांनी मांजरी येथे प्रत्यक्ष पाहणी केली.
मांजरी योजनेत विद्युत देयकासाठी कोणतीही तरतूद नसल्याने प्राधिकरणाकडून विद्युत देयके भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावरील क्रॉसिंग व लगतच्या अन्य कामांसाठी दोन कोटी ६२ लाख सात हजार रुपयांची मागणी संबंधित विभागाने केलेली आहे.