Pune: वाहतूक पोलिसांकडे का केली जातेय रस्ता दुरुस्तीची मागणी?

Pothole
PotholeTendernama
Published on

पुणे (Pune) : अरुंद रस्ता, त्यावर असणारे खाचखळगे, अवजड वाहतूक व त्यातच पोलिस नियंत्रकाचा अभाव, यामुळे महादेवनगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाजवळील चौकात प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थी व नोकरदारांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने हतबल विद्यार्थ्यांनी अखेर हातात फलक घेऊन ‘काका, तुम्ही आम्हाला शाळेत वेळेवर पोहोचायला मदत करता का,’ असा आर्त प्रश्न वाहतूक पोलिसांना केला आहे.

Pothole
Tender Scam: एकाही रुग्णवाहिकेचा पुरवठा न करता ठेकेदारांवर महिना 33 कोटींची दौलतजादा

रवीदर्शन चौकामार्गे पुढे सिरम इन्स्टिट्यूट ते अण्णासाहेब मगर महाविद्यालयामागील रस्ता व चौक याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. साधना व पारिजात कॉलनी परिसरात सतत नादुरुस्त होत असलेले चेंबर्स, सिरम इन्स्टिट्यूट ते मगर महाविद्यालयामागून होणारी अवजड वाहतूक, खड्डे पडलेला अरुंद रस्ता आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे ही कोंडी होत आहे. परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, कामगार व इतर नागरिकांना हा चौक ओलांडून प्रवास करावा लागतो.

महाविद्यालयामागील अरुंद रस्त्याने दुहेरी वाहतूक होत आहे. शाळकरी विद्यार्थी व कामगारांना हा रस्ता हडपसर कडे जा-ये करण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, कंटेनरसारख्या अवजड वाहनांसह इतर मोठी वाहनेही याच रस्त्याने प्रवास करीत असल्याने ती अडकल्यावर संपूर्ण रस्ता बंद होऊन जातो. परिणामी चौकातही कोंडी वाढते. मुख्य मांजरी रस्त्यावर ही कोंडी पसरत असल्याने इतर वाहनांना बाहेर पडताना मोठी अडचण निर्माण होते.

Pothole
राज्यातील वीजग्राहकांना बसणार मोठा दणका; काय आहे कारण?

विद्यार्थी व कामगारांना वेळेत इच्छितस्थळी पोहोचता येणे अवघड होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासकीय व्यवस्था त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालक व नागरिक निर्मला बहिरट, राजू तुपे, बाळू चव्हाण, ज्योत्स्ना जाधव, शीतल वाघे, सुरेश गुंडाले यांनी केला आहे.

दरम्यान, या परिस्थितीकडे पालिका व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन हडपसर पोलिसांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन येथील वाहतूक कोंडी सोडवून पोलिसकाकांनी आम्हाला वेळेवर शाळेत पोहोचायला मदत करावी, असे साकडे घातले आहे. ‘मनसे’चे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उपविभाग अध्यक्ष अजय जाधव, वैदुवाडी शाखाध्यक्ष अमित मिरेकर, फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Pothole
Nagar: बांधकाम कामगार मंडळाच्या 'त्या' धोरणांना का होतोय विरोध?

रवीदर्शन चौकातून मांजरीकडे येणाऱ्या रस्त्यावर कमी उंचीचा लोखंडी गर्डर लावून अवजड वाहनांवर कायमस्वरूपी प्रवेशबंदी करणार आहे. मगर कॉलेज चौकात वाहतूक पोलिसाची नेमणूक करून वाहतूक नियंत्रण केले जाईल.

- राजेश खांडे, पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com