पुणे (Pune) : वेस्टएंड ते भाले चौक या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी करत औंध नागरी हक्क समितीच्या पुढाकारातून स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले.
येथील वाहतूक कोंडी सोडवायची असेल, तर महादजी शिंदे रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, परंतु यातून प्रशासन मार्ग काढत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी भेट देऊन लोकांच्या भावना जाणून घेतल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरणाचा प्रश्न येथील नागरिकांनी मांडला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या जागा ताब्यात घेऊन या रस्त्याचे लवकर रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत भाले चौकात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
औंधमधील सर्वात मोठे मॉल या ठिकाणी असून, येथील रस्ता अरुंद असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी असलेल्या वायरलेस कॉलनीसह अनेक सोसायट्यांतील नागरिकांना या वाहतूक कोंडीचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. नको असलेली रस्त्याची कामे होतात, परंतु या ठिकाणी जागा ताब्यात घेऊन रस्ता रुंद का केला जात नाही, असा सवालही या आंदोलनप्रसंगी नागरिकांनी उपस्थित केला.
विकास आराखड्यात मॉल समोरील रस्ता २४ मीटरचा असून, प्रत्यक्षात मात्र हा रस्ता १० मीटरचा असल्याने या ठिकाणी रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. या अरुंद रस्त्यामुळे भाले चौकात रोजच वाहतूक कोंडी होते. याप्रसंगी अरुण भापकर, सतीश जोशी, डॉ. शुभा चांदोरकर आदींनी समस्या मांडल्या.
रस्त्याची नको असलेली कामे प्राधान्याने केली जात आहेत, मात्र ती कामे करण्यापेक्षा वेस्टएंड ते भाले चौक या दरम्यानचा रस्ता रुंदीकरण करुन वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा.
- ॲड. मधुकर मुसळे, औंध नागरी हक्क समिती
येथील जागा ताब्यात घेण्याच्या बाबतीत येत्या आठवड्याभरात विविध विभागांच्या बैठकी घेऊन योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका