पुणे (Pune) : ‘पीएमपी’ (PMC) प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन आणि कारभारामुळे बसथांब्यांअभावी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. ना धड बसथांबे, ना आसन व्यवस्था, बसथांब्यांना गळती आणि अस्वच्छता अशा विविध समस्यांचा सामना सध्या लाखो प्रवासी करत आहेत.
दररोज सुमारे १३ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ‘पीएमपी’ला प्रवासी सुविधांचा पुरता विसर पडला आहे. दुसऱ्या बाजूला निधीच उपलब्ध नसल्याने बसथांबे बांधावे कसे, असा प्रश्न ‘पीएमपी’ला पडला आहे. निधीच्या गोंधळात प्रवासीराजा मात्र उन्हातान्हात आणि आता पावसात भिजत पडला आहे.
‘पीएमपी’ला भेटेना ‘माननीय’
गेल्या काही वर्षांत ‘पीएमपी’ प्रशासनाने बीओटी तत्त्वावर बसथांबे बांधण्याचे काम केले. मात्र जाहिरातदारांचा त्यालादेखील अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने बसथांब्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात मागील १० वर्षांत केवळ ७०० बसथांबे बांधले आहेत. यातील अनेक थांबे ‘माननीय’ अर्थात लोकप्रतिनिधींच्या खर्चातून बांधलेले आहेत. मात्र ते देखील काम सध्या थांबलेले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रवासी पावसात भिजत असून, बसथांब्यांअभावी त्यांचे हाल सुरू आहेत.
‘पीएमपी’ प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बसथांब्यांसाठी सात वेळा टेंडर प्रसिद्ध करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बसथांब्यांच्या नियमावलीत बदल केला. त्यानंतर ३०० स्टेनलेस स्टीलचे बसथांबे बांधण्याचा निर्णय झाला. दोन वर्षांत ३०० पैकी १०० थांबे बांधण्यात आले. २०० थांब्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही, तर मागील सहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’ने २०० बसथांबे बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. त्याचे टेंडर आतापर्यंत दोन वेळा प्रसिद्ध झाले. मात्र त्याला जाहिरातदारांचा प्रतिसाद लाभलाच नाही. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासन हतबल झाले आहे.
गरज ९०००, प्रत्यक्षात १३२०
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका व ‘पीएमआरडीए’ हद्द असे तिन्ही क्षेत्र मिळून तसेच येणाऱ्या व जाणाऱ्या अशा दोन्ही मार्गांचा विचार करून ‘पीएमपी’कडे सुमारे नऊ हजार बसथांब्यांची नोंद आहे. पैकी केवळ १३२० ठिकाणीच छत असलेले थांबे आहेत. त्यात ‘बीआरटी’च्या १२० थांब्यांचा समावेश आहे. थांब्यांसारखी प्राथमिक सुविधा देण्यातच ‘पीएमपी’ला अपयश येत आहे. निधीची कमतरता सांगत त्यांनी जाहिरातदारांकडे बोट केले आहे.
शेड नसल्याने हाल
१. प्रवाशांना तळपत्या उन्हातच उभे राहावे लागते
२. पावसाळ्यातदेखील प्रचंड गैरसोय
३. ज्येष्ठ, महिला, लहान मुलांना बसायला जागाच नाही
४. लहान मुलांना कडेवर घेऊनच महिलांना बसची वाट पाहावी लागते
‘पीएमपी’ दृष्टिक्षेपात
- एकूण बससंख्या : १६५०
- दैनंदिन प्रवासीसंख्या : सुमारे १३ लाख
- एकूण बसथांबे : ९०००
- शेड असलेले थांबे : १२००
- बीआरटी मार्गावर थांबे : १२०
- छत असलेल्या एक थांब्याचा खर्च : सुमारे ४ लाख
बसथांब्यांचा प्रश्न नेमका काय आहे, हे समजून घेत आहे. हा प्रश्न अद्याप माझ्यासमोर आला नव्हता. यानिमित्ताने तो समजून घेईन. त्यानंतरच अधिक बोलणे योग्य ठरेल.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे