पुणे (Pune) : सिमला ऑफिस चौकात (Shimla Office Chowk) मेट्रोचे काम करताना पादचाऱ्यांच्या सुरक्षेला कात्रजचा घाट दाखविण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठी सुविधा महापालिका (PMC) देणार की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यात हा प्रश्न गंभीर बनला आहे.
महापालिकेने यासंदर्भात ‘पीएमआरडीए’ला पत्र पाठवले होते. पण अद्याप तेथे कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ने लगेच बॅरिकेड्स लावले जातील, असे स्पष्ट केले आहे.
शहरातील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक म्हणून सिमला ऑफिस चौकाची ओळख आहे. या परिसरात रेल्वेस्थानक, मेट्रोस्थानक, शाळा, एलआयसी कार्यालय, रुग्णालय, हॉटेल, अनेक शासकीय कार्यालये आहेत.
या चौकात ‘पीएमआरडीए’कडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खांब उभारण्यात येत आहेत. त्यासाठी बॅरिकेडिंगही करण्यात आलेले आहे.
सिमला ऑफिस चौकातून पिंपरी-चिंचवड भागातील अनेक महाविद्यालयीन तरुण शिवाजीनगर स्थानकात उतरून चालत पुढे जातात. या विद्यार्थ्यांनाही बॅरिकेडिंगच्या शेजारी थांबलेल्या वाहनांपासून सांभाळून चालावे लागते. महिला, ज्येष्ठ नागरिकांचेही असे हाल होत आहेत. त्याच प्रमाणे पीएमपीच्या प्रवाशांना रस्त्यावर थांबण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’ करत असल्याने तेथे पादचाऱ्यांसाठी त्यांनीच सुविधा निर्माण उपलब्ध करणे आवश्यक आहे. यापूर्वी तेथे बॅरिकेड्स लावून पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र नंतर हे बॅरिकेड्स काढून टाकल्याने पादचारी थेट रस्त्यावर आले आहेत. याबाबत पादचाऱ्यांची सुरक्षितपणे चालण्यासाठी व्यवस्था करावी, असे पत्र महापालिकेने ‘पीएमआरडीए’ला दिले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
सिमला ऑफिस चौकात मेट्रोचे काम करताना ‘पीएमआरडीए’ने पादचारी मार्ग काढून टाकला आहे. या चौकात चालणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने पादचारी मार्गाची आवश्यक आहे. यासंदर्भात ‘पीएमआरडीए’ला पत्र लिहून पादचारी मार्ग करावा, अशी सूचना केली आहे.
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका
सिमला ऑफिस चौकातील पादचाऱ्यांसाठी बॅरिकेडिंग केले होते. पण आषाढी वारीमुळे ते काढून टाकण्यात आले. आता पुन्हा ते केले जाईल.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए