पुणे (Pune) : हडपसर रेल्वे टर्मिनसच्या (Hadapsar railway Terminus) विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता आहे. काही जागा रेल्वे प्रशासन ताब्यात घेत आहे, तर स्वतःच्या मालकीच्या जागेवर असलेल्या इमारती पाडून त्या जागी मोठा रस्ता व पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.
सध्या स्थानकासमोरच्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारती पाडल्या जात आहे. लवकरच आरपीएफची चौकीही पाडण्यात येणार आहे.
हडपसर टर्मिनसच्या विकासासाठी रेल्वे बोर्ड कडून १३५ कोटी रुपयांचा निधी पुणे विभागाला मिळाला आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनसच्या विकासासाठी रेल्वे प्रशासन विकासकामे विकास कामे सुरू झाले आहे. पण, टर्मिनसच्या बाहेरचा रस्ता हा अरुंद आहे. त्यामुळे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाय प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंग साठी जागा नसल्याने ती रस्त्यावर लावली जातात.
त्यामुळे रेल्वेच्या जागेवरील इमारती पाडून त्या जागी रस्ता व वाहनासाठी वाहनतळ (पार्किंग) केले जात आहे. पुणे स्टेशनच्या यार्ड रिमॉडेलिंग वेळी काही गाड्या हडपसर येथून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे टर्मिनसच्या बाहेरचे काम होणे अपेक्षित होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने टर्मिनसच्या बाहेरील रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वाटर्स पाडण्यास सुरवात केली असल्याची माहिती पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिली.