पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील (SPPU) आचार्य आनंदऋषी महाराज चौकात मेट्रो (Metro) व बहुमजली उड्डाणपुलाचे (Flyover) काम सुरू असून, महापालिका (PMC) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणावर भर देत आहेत.
रुंदीकरणासाठी तेथील बहुतांश रहिवासी, सरकारी व खासगी संस्था, उद्योजकांनी त्यांच्या जागेचा ताबा दिला आहे. असे असतानाही रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने गणेशखिंड (Ganeshkhind) रस्त्यावरील केंद्र सरकारशी संबंधित एका संस्थेला सक्तीने भूसंपादन करण्याबाबतची नोटीस बजावली आहे.
पुणे विद्यापीठाकडून रेंजहिल्स कॉर्नर व तेथून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्यावरील २१ जागा महापालिका प्रशासनाला रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक होत्या. त्यापैकी बहुतांश जागा मालकांनी यापूर्वीच आपल्या जागेचा ताबा देऊन रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित जागा शासकीय तंत्रनिकेतन, महावितरण, आरबीआय यांच्यासह काही संस्थांच्या आहेत.
दरम्यान, रस्ता रुंदीकरणास येणाऱ्या अडथळ्यांची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः घेतली होती, त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन व महावितरणला त्यांच्या जागा तत्काळ देण्याच्या सूचना दिल्या होत्या. ‘आरबीआय’कडूनही त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.
महापालिकेने गणेशखिंड रस्त्यावरील नॅशनल इन्फॉरर्मेटीक्स सेंटर (NIC) या केंद्रीय संस्थेला ही रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाने संबंधित संस्थेस सक्तीने भूसंपादन करण्याची नोटीस बजावली आहे. ‘एनआयसी’ समोरील जागा उपलब्ध झाल्यास रस्ता रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील रस्ता रुंदीकरणासाठी ‘एनआयसी’ या संस्थेकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना सक्तीने भूसंपादन करण्याची नोटीस बजावली आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका