पुणे (Pune) : वाहतूक कोंडीचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही, तर उद्योग क्षेत्रालादेखील बसत आहे.
मरकळ-धानोरे ते आळंदी रस्त्यावर गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांसह विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना व कामगारांना कंपनीत येण्यासाठी सुमारे दोन तास उशीर होत आहे. त्याचा प्रमाण उद्योगांवर होत असल्याने परिसरातील उद्योजक हैराण झाले आहेत.
दरम्यान, वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी यासाठी प्रशासनाने जड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी इंद्रायणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. मरकळ-धानोरे ते आळंदी मार्गावर सुमारे ३००हून अधिक कंपन्या आहेत. यात १५ हजारांहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. गेल्या १५ दिवसांत या रस्त्यावरून जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
लोणीकंद मार्गे ही वाहने आळंदी रस्त्यावरून धावत आहेत. यात टिप्पर व ट्रकसारख्या वाहनांची संख्या अधिक आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास व घरी जाण्यास दोन ते तीन तासांचा उशीर होत आहे. शिवाय स्थानिक नागरिकांनादेखील या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
यामुळे अपघाताची शक्यतादेखील नाकारता येत नाही. तेव्हा वाहतूक पोलिसांनी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जड वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी राजेंद्र कांबळे यांनी केली.
या संदर्भात वाहतूक पोलिसांसह अन्य संबंधित यंत्रणांनादेखील पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे खजिनदार शंकर साळुंखे, उपाध्यक्ष महेंद्र फणसे उपस्थित होते.
का होते वाहतूक कोंडी?
- चाकण-शिक्रापूर मार्गे अहिल्यानगरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहतुकीवर निर्बंध
- परिणामी ही जड वाहनांची वाहतूक मरकळ रस्त्यावरून होत आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ
- मरकळ रस्त्यावर धानोरे फाटा, पी.सी.एस. चौक व दाभाडे सरकार चौक येथे मोठ्या प्रमाणात खड्डे
- खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊन बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ
- जड वाहतूक व खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ