पुणे (Pune) : महर्षी कर्वे पुतळा ते मुंबई-बंगळूर महामार्ग जोडणारा डीपी रस्ता चारशे मीटरच्या भूसंपादनाअभावी अपूर्ण राहिला आहे. पौडरस्त्याला समांतर असलेला हा पर्यायी मार्ग झाला तर कोथरूडकरांना (Kothrud) महामार्गावर पोहचणे अधिक सोईस्कर होणार आहे.
दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला हा रस्ता किरकोळ संपादन राहिले असल्यामुळे अपूर्ण राहिला आहे. लोकप्रतिनिधींनी इच्छा शक्ती दाखवली तर हा रस्ता केव्हाच पूर्ण झाला असता. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर हा रस्ता पूर्ण करायचा आहे म्हणूनच तो रखडवला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मोहिते पाटील शाळेपासून महामार्गाकडे जाताना अपूर्ण रस्त्याचा वापर नागरिक करतात म्हणून काही जणांनी जाणून बुजून येथे राडारोडा आणून टाकला आहे. बॅरिकेडस लावले आहे. त्यामुळे मोठी वाहने याबाजूने जात नाहीत. मात्र, दुचाकीचालक कसरत करत या मार्गाचा वापर करतात. बॅरिकेडस व राडारोडा बाजूला करून येथे डांबरीकरण करावे व वाहनचालकांना महामार्गाकडे जाण्यासाठी तातडीने रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील म्हणाले, ‘‘एकलव्य कॉलेज ते जिजाई नगरी, एकलव्य कॉलेज ते महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज ते महामार्ग या तीन रस्त्यासाठी मी आग्रही आहे. परंतु, झारीतील शुक्राचार्य बनून या कामात काहीजण अडथळा आणत आहेत. अधिकाऱ्यांनी विकासाला प्राधान्य द्यावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’
शैक्षणिक संस्थेला सरकारी, गायरान जमिनीची जागा शैक्षणिक कारणासाठी देण्यात आली होती. त्यापैकी शैक्षणिक कारणासाठी वापरात नसलेली जी मोकळी जागा आहे, त्यातील आवश्यक जागा संपादित करून वा तेथून तात्पुरत्या स्वरूपाचा डांबरी रस्ता केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. वाहतुकीचा ताण कमी होईल. यासंदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र देवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
- सचिन धनकुडे, अध्यक्ष, चेंज इंडिया फाउंडेशन
एकलव्य कॉलेज ते महामार्ग रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर असून, जागा मालकांशी सकारात्मक बोलणी झाली आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल.
- विकास ढाकणे, विशेष अतिरिक्त आयुक्त, महापालिका