पुणे (Pune) : ‘रस्त्यांवरील खड्डे, ठेकेदारांच्या कमाईचे अड्डे’, ‘जागे व्हा, जागे व्हा, आयुक्त साहेब जागे व्हा’, ‘हे का सुंदर पुणे, हीच का स्मार्ट सिटी’, अशा घोषणा देत तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांभोवती (Potholes) रांगोळी काढून त्यामध्ये झाडे लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) नुकताच महापालिका (PMC) प्रशासनाचा निषेध नोंदविला.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असूनही त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावत प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील नेहरू चौक, गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक, रविवार पेठेतील दर्ग्याजवळील रस्ता व बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोरील रस्ता या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांभोवती मनसेच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढली. त्यानंतर खड्ड्यांमध्ये झाडे लावून, संबळवादन करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.