पुणे (Pune) : पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचे (Pune Metro) ऑडिट करून त्याचा तपासणी अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (COEP) अखेर रविवारी दाखल केला. मेट्रोचा मार्ग आणि चारही स्थानकांचा पोलादी आराखडा (स्ट्रक्चर) व्यवस्थित असून, किरकोळ प्रकारच्या सुमारे ३० त्रुटींचा त्यात समावेश आहे. त्यांची पूर्तता एक आठवड्यात करणार असल्याची ग्वाही ‘महामेट्रो’ने मंगळवारी दिली.
वनाज-गरवारे महाविद्यालय मार्गावरील वनाज, आनंदनगर, नळस्टॉप आणि गरवारे कॉलेज या स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, अशी मागणी नागरिक नारायण कोचक आणि शिरीष खासबारदार यांनी एका जनहितार्थ याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने १७ एप्रिल रोजी निकाल दिला आणि ‘सीओईपी’ला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश दिला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार, ‘सीओईपी’ने स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल रविवारी महामेट्रोला सादर केला. त्यात पोलादी आराखडा सुरक्षित आहे. परंतु, सुमारे ३० त्रुटींचा त्यात समावेश आहे. काही ठिकाणी वेल्डिंग व्यवस्थित झालेले नाही, काही ठिकाणी नटबोल्ट सैल झाले आहेत, मोठ्या स्क्रूंमध्ये वॉशरचा अभाव आहे, काही ठिकाणी लेव्हल मॅच झालेली नाही आदी प्रकारच्या त्रुटींचा त्यात समावेश आहे.
या त्रुटी दूर करण्यासाठी महामेट्रोने काम सुरू केले आहे. येत्या ७- ८ दिवसांत ते काम पूर्ण होईल, अशी ग्वाही महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली. काम पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल ‘सीओईपी’ला पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कोचक यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘‘सीओईपीने अहवाल दिला असेल तर, तो महामेट्रोने नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करणे गरजेचे आहे. मेट्रोच्या कामासाठी नागरिकांचा पैसा वापरला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत कोणत्या त्रुटी आहेत, त्यांची पूर्तता कशी केली, हे नागरिकांना माहिती होणे गरजेचे आहे.’’
दरम्यान, मी आणि खासबारदार यांनी २९ एप्रिल रोजी महामेट्रो आणि ‘सीओईपी’ला पत्र लिहून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर दोन्ही संस्थांनी प्रतिसाद दिलेला नाही, असे कोचक यांनी सांगितले.