पुणे, ता. ५ ः पुणे - सातारा रस्त्यावरील (Pune - Satara Road) शंकर महाराज उड्डाणपुलावरील विद्युत व्यवस्था सुस्थितीत असतानाही G-20 च्या नावाखाली ठिकठिकाणी नवी उपकरणे लावण्यासाठी ४१ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मुदत उलटून दीड महिना झाला तरीही ती कामे अर्धवटच आहेत.
पुण्यात ‘जी २०’ परिषदेनिमित्ताने सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, विद्युत रोषणाई व स्वच्छतेसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामध्ये विद्युतविषयक कामांसाठी १३ कोटी रुपये दिले आहेत. त्यादृष्टीने विद्युत विभागाने प्रमुख रस्ते, उड्डाणपुलांवर प्रकाश व्यवस्थेसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली. यामध्ये शंकर महाराज उड्डाणपुलावरील कामासाठी नऊ लाख ७० हजार ५९८ रुपये आणि ३१ लाख ५२ हजार ५५ रुपये अशा ४१ लाख २२ हजार रुपयांच्या दोन टेंडर मे मध्ये काढल्या. हे काम एका महिन्यात पूर्ण करण्याची अट असतानाही ते अर्धवटच आहे.
उड्डाणपुलाच्या खालील बाजूला सातारा रस्त्यावरील चांगल्या स्थितीतील पथदिवे काढून उड्डाणपुलाच्या भिंतीवर ब्रॅकेट लावून पथदिवे बसवणार आहेत. हा खर्च का केला जात आहे?, याबाबत विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांच्याकडे चौकशी केली असता, हे खांब काढून समाविष्ट गावांमध्ये लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाच्या भिंतीवर निळ्या रंगाचे ब्रॅकेट लावले असून केबल टाकणे, जंक्शनमध्ये त्यांची जोडणी करणे ही कामे झाल्याचा दावा अभियंत्यांनी केला आहे. मात्र, हे काम होऊन महिना उलटून गेला तरीही दिवे बसविण्याचे काम झाले नाही. त्यावर विद्युत विभागाने, ‘‘आम्हाला ६० दिव्यांची गरज आहे, ४८ दिवे जुन्या खांबांवरून मिळाले आहेत, उर्वरित दिव्यांसाठी जुळवाजुळव सुरू आहे,’’ असे सांगितले.
उड्डाणपुलाखालील अनेक दिवे बंद पडल्याने दोन महिन्यांपूर्वी त्याची दुरुस्ती केली होती. आता यातील अनेक दिवे पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अंधार पसरला आहे.
उड्डाणपुलावरील विद्युत व्यवस्थेसाठी ४१ लाख रुपयांचे टेंडर काढले. पथदिवे लावण्यासाठी १६ जून रोजी ब्रॅकेट बसवले. पण पुढील काम झाले नाही. एवढा खर्च करूनही उड्डाणपुलावरील आणि खालील दिवे बंद आहेत. याची चौकशी झाली पाहिजे.
- आदित्य गायकवाड, नागरिक
उड्डाणपुलाच्या खालील सेवा रस्त्यावरील पथदिवे काढून ते नव्या ब्रॅकेटमध्ये लावणार आहे. ‘जी २०’मधील अपूर्ण कामे पूर्ण केली जातील. जे पथदिवे बंद आहेत, त्याबाबत चौकशी केली जाईल.
- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग