Pune: जेव्हा रेल्वेच प्रवाशांची फसवणूक करते तेव्हा...
पुणे (Pune) : रेल्वे प्रवासी थ्री टियर एसीचे तिकीट काढतात, मात्र प्रवास इकॉनॉमी (वातानुकूलित) दर्जाच्या डब्यांतून करावा लागत आहे.
रेल्वेच्या गलथानपणाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. हा प्रकार पुण्याहून धावणाऱ्या सिद्धेश्वर व उद्यान एक्स्प्रेसच्या रेल्वे गाड्यांबाबत घडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.
सोलापूर-मुंबई-सोलापूर दरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेस धावते; तर मुंबई-बंगळूर-मुंबईदरम्यान उद्यान एक्स्प्रेस धावते. या दोन्ही रेल्वेगाड्यांचे रेक इंटिग्रेशन आहे. या दोन्ही रेल्वे पुणे स्थानकावरून धावतात. त्यामुळे या गाड्यांमध्ये पुण्याहून प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त आहे.
रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित तृतीय श्रेणीचे (टियर) पाच डबे जोडलेले आहेत. यात बी एक ते बी पाचपर्यंत अशी डब्यांची क्रमवारी आहे. यातील चार व पाच क्रमाकांचे डबे हे इकॉनॉमीचे आहे. इकॉनॉमी तिकीट दर हे थ्री टियरच्या तुलनेत कमी आहे. प्रवासी जास्तीचे दर असलेल्या डब्याचे तिकीट काढतात, मात्र प्रवास इकॉनॉमी डब्यातून करावा लागतोय. दोन डबे इकॉनॉमी आहेत.
या दोन्ही गाड्यांचा पुणे विभागाशी संबंध नाही. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ही बाब मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या लक्षात आणून दिली जाईल. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ.
- डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे